उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरूद्ध आरोपांची राळ उडवणारे कलानी समर्थक आणि भाजप पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र सत्तेत आले आहेत. कलानी समर्थक महापौरपदी तर भाजपचे उपमहापौर उल्हासनगरात विराजमान झाले असले तरी त्यांच्यातील मतभेद मात्र संपलेले नसल्याचे चित्र आहे. उल्हासनगरात महापौर अश्विनी निकम यांचे अभिनंदन करणारे फलक शहरात कलानी गरटाकडून लावण्यात आले असले तरी त्यावर फक्त दोस्ती का गठबंधन असाच उल्लेख करून भाजपला टाळण्यात आले आहे. तर भाजपच्या प्रचारप्रमुखानींही आम्ही सत्तेत असलो तरी पहारेकरी म्हणून काम करू आणि गुंडगिरीला विरोधाची भूमिका कायम राहिल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कमकुवत विरोधीपक्षाची भूमिका सत्ताधारीच पार पाडणार का अशी चर्चा रंगली आहे.

उल्हासनगर महापालिकेत विचित्र राजकीय सत्तासमिकरणांचा इतिहास जुना आहे. एकमेकांविरूद्ध लढणारे सत्तेसाठी एकत्र येत अभद्र युती तयार करण्याची उल्हासनगरची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने टीम ओमी कलानी यांच्यासह साई पक्ष, रिपाई, पीआरपी यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवली. तर भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवली. मात्र तरीही कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. शिवसेनेने ३६ जागा मिळवल्यानतंर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवत अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेचे गणित जुळवले होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर भाजपसोबत युती करण्याची वेळ शिवसेनेवर आली. त्यामुळे उपमहापौरपदासह सत्तेचा वाटा भाजपला देण्यास शिवसेनेला भाग पडले.

मात्र महापौर पदाची संधी शिवसेनेच्याच मात्र कलानी समर्थकाला मिळाली. त्यामुळे एकमेकांना राजकीय पटलावरून संपवण्याची भाषा करणारे कलानी आणि भाजप सत्तेत मांडीला मांडी लावून बसले. त्यामुळे सत्तेसाठी विरोधक एकत्र आल्याची चर्चा होती. मात्र महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतरही कलानी गट आणि भाजपातील संघर्ष सुरू असल्याचेच चित्र समोर आले आहे. शहरात कलानी समर्थकांनी लावलेल्या फलकांवरून भाजप नेते आणि उपमहापौर गायब असल्याचे दिसून आले आहे. कलानी गटाने शिवसेनेसोबत असलेल्या ‘दोस्ती का गठबंधन’ एवढा उल्लेख करत भाजपशी आमची युती नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे कलानींचा भाजपसोबतचा संघर्ष सत्तेतही दिसून येईल का अशा चर्चा रंगल्या आहेत.

भाजपही तितकाच आक्रमक

भाजपने निवडणुकीत कलानी गटावर टीका करताना गुंडगिरी संपवणार अशी घोषणा केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते. सत्तेत बसल्यानंतरही भाजपने आपली हीच भूमिका कायम ठेवल्याचे चित्र आहे. आम्हाला मतदारांनी शिवसेनेपेक्षा १७ हजार मते अधिक दिली आहेत. आमच्यावर निवडणुकीपूर्वी अन्याय झाला होता. मात्र वरिष्ठांमुळे आम्ही सत्तेत आहोत. गुंडगिरी चालणार नाही अशी भूमिका आमची यापूर्वीही होती आणि पुढेही राहील, असे भाजपचे प्रचारप्रमुख प्रदिप रामचंदाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. आम्ही सत्तेत असलो तरी पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहू असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपचा कलानींविरोध सत्तेत राहूनही कायम राहणार असल्याचे दिसते आहे.