उल्हासनगरः सर्व पक्षांमध्ये काम करून अखेर शिंदेंच्या शिवसेनेत स्थिरावलेले माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी रविवारी अचानक त्यांच्या जुन्या पक्षाच्या अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पत्रकार परिषदेत अवतरले. तेथे रिपाइंचा पट्टा गळ्यात घालून पक्षप्रवेश केल्याप्रमाणे त्यांनी सत्कार स्विकारले. याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली. मात्र काही वेळातच पप्पू कलानी यांना पुन्हा माध्यमांपुढे येऊन आपण रिपाइंत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट करावे लागले. त्यामुळे उल्हासनगरात काही काळ राजकीय उलथापालथीचे चित्र निर्माण झाले होते. नक्की त्या तासाभरात नक्की काय घडले अशा चर्चा आता उल्हासनगरात रंगू लागल्या आहेत.
उल्हासनगर शहरातील राजकारण गेल्या काही दशकांपासून कलानी कुटुंबियांच्या आसपास फिरत असते. महापालिका, विधानसभा, लोकसभा असो वा शहरात राजकीय भूमिका घेणे. सर्वांमध्ये कलानी काय करतात हे महत्वाचे ठरते. सुरेश उर्फ पप्पू कलानी यांच्या रूपाने कलानी गटाचे राजकारण पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. कलानी गटाने शिंदेंच्या शिवसेनेशी युती करत आपले शिलेदार महापौरपदावर विराजमान करून पालिकेवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
शहरात शिंदेंची शिवसेना, भाजप, रिपाइं(आठवले) आणि कलानी एकत्र येत सत्तेवर असतानाच रविवारी शहरात राजकीय खळबळ माजवणारी घटना समोर आली. उल्हासनगर रिपाइंच्या बैठकीत रिपाइंचे नेते सुरेश बारशिंगे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा केली जाणार होती. यावेळी नाना बागूल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र या रिपाइंच्या बैठकीत अचानक माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी अवतरल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. काही वेळातच रिपाइंच्या वतीने पप्पू कलानी यांनी रिपाइंत प्रवेश केल्याचे घोषीत करण्यात आले. पप्पू कलानी यांनीही माध्यमांनी विचारल्यानंतर, माझ्या गळ्यात रिपाइंची पट्टी दिसते त्यावरून तुम्ही समजून घ्या, असे उत्तर दिले. तसेच माझा आणि रिपाइंचा जुना संबंध असून मी माझे उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पप्पू कालनी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रिपाइंच्या नेत्यांनीही कलानींचे सत्कार करून त्यांना रिपाइंत चांगले पद मिळेल असेही घोषीत केले.
पप्पू कलानी यांच्या रिपाइं प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. मात्र तासाभरातच पप्पू कलानी यांना पुन्हा माध्यमांसमोर येण्याची वेळ आली. यावेळी कलानी थोडे नरमले होते आणि आपण रिपाइंत प्रवेश केलेला नाही, अशी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. आपण यापूर्वी भाजपाच्या एका कार्यक्रमातही गेलो होतो. तेव्हाही माझ्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालण्यात आला होता. त्यामुळे पट्ट्यावरून अंदाज लावणे योग्य नसल्याचे कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच माझी मुलगी शिवसेनेची नगरसेवक असून माझ्या मुलाच्या टीओकेने शिवसेनेसोबत निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते सोडून कुठेही जाण्याचा प्रश्न येत नाही, अशीही स्पष्टोक्ती पप्पू कलानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कलानी यांच्या माध्यमांशी वार्तालापानंतर अखेर रिपाइं पक्षप्रवेशाच्या नाट्यावर पडदा पडला. मात्र त्या मधल्या काळात अशी कोणती सुत्रे हलली किंवा कोणते दूूरध्वनी आले की ज्यामुळे स्पष्टीकरणासाठी कलानींना पुढे यावे लागले, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शहरातल्या राजकीय वर्तुळात मात्र काही तासांपुरता ही घटना खळबळ माजवणारी ठरली.
