उल्हासनगर : शहरात सध्या खड्डे, वाहतूक कोंडी आणि ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहरातील लोकप्रतिनिधी मात्र लाखो रुपयांची उधळपट्टी करत गुवाहाटी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने उल्हासनगरकरांच्या संतापात भर पडली. या प्रशासकीय निष्क्रियतेविरोधात नागरिकांनीच आक्रमक पवित्रा घेतला असून, याबाबत ११ ऑगस्ट रोजी उल्हासनगर महापालिकेसमोर चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. रिक्षा चालक संघटनांनी हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून उल्हासनगर शहरातील डांबरी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात. अनेक कॉंक्रिट रस्ते, रस्त्यांचे जोड भागही यातून सुटलेले नाहीत. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि रिक्षाचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यांवर पाणी साचते आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने होणाऱ्या अपघातात माेठी वाढ झाली आहे. कर भरूनही पदरी केवळ खड्डे आणि हालच येत असल्याने नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे शहर खड्ड्यांत आणि कोंडीत अडकले असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी नुकतीच गुवाहाटी येथे लाखोंची उधळपट्टी करत प्रशिक्षणासाठी वारी केली. या प्रशिक्षणाचा उपयोग उल्हासनगरचे जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी किंवा इथली तुंबणारी गटारे साफ करण्यासाठी होणार आहे का असे खरमरीत प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, झोपलेल्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी कै. रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटनेने ११ ऑगस्टला महापालिकेवर धडक देण्याचा इशारा दिला आहे.
‘आश्वासनांचा फार्स आता बास’
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी प्रशासनाला धारेवर धरत, केवळ पाहणी दौरे आणि ‘आश्वासनांचा फार्स आता बास’ झाला, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. खड्डे बुजविल्याचा दावा पालिका करत असली तरी, काही दिवसांतच ते पुन्हा उखडत आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशी प्रमुख मागणी भुल्लर यांनी केली आहे.
मोहिमही तीच, खड्डेही तेच, कारभारी नवे
– काही महिन्यांपूर्वी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगरात पडलेल्या खड्ड्यांवरून तत्कालीन कलानी गटाचे सर्वेसर्वा ओमी कलानी यांनी शर्म करो, खड्डे भरो हे अभियान समाज माध्यमांवर चालवले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
– खड्डे भरण्याचा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र निवडणुकीनंतर कलानी समर्थक शिवसेनेच्या माध्यमातून महापौरपदी विराजमान झाले आहेत. मात्र शहरातील खड्डे जैसे थे आहेत. आता नव्याने सुरू झालेल्या अभियानात कलानी गट नसला तरी कलानी सध्या सत्तेत आहेत. त्यामुळे आता तरी खड्डे भरले जातील का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
