उल्हासनगर : शासनाच्या तसेच सिंधी निर्वासितांच्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित केल्याच्या तक्रारीप्रकरणी आता सखोल चौकशी होणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने एका विशेष उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली असून, या समितीला २५ दिवसांच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या जागा खासगी मालकांच्या नावे करून त्याची विक्री वा शासनाकडून त्या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) मिळवला जात असल्याची तक्रार भाजप पदाधिकाऱ्याने केल्यानंतर चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरात फाळणीनंतर स्थायिक झालेल्या निर्वासीत सिंधी समाजाला शासनाकडून मालमत्ता देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत या मालमत्तांचे बनावट कागदपत्रे आणि खोट्या माहितीच्या आधारे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे गंभीर आरोप होत होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी महसूल मंत्र्यांकडे लेखी तक्रार केली होती.
रामचंदानी यांच्या या तक्रारीची दखल घेत राज्याच्या महसूल विभागाने या मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. यात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस यांचा समावेश करण्यात आला आहे.
२०१९ पासूनच्या व्यवहारांची तपासणी
या विशेष समितीला २०१९ सालापासून झालेल्या निर्वासित मालमत्तांच्या व्यवहारांची तपासणी करायची आहे. यात प्रामुख्याने मालमत्तांचे अभिहस्तांतरण दस्तऐवज, मालकी हक्कात झालेले बदल व संशयास्पद वाटणाऱ्या व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. येत्या २५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.
आरोप काय?
शासनाच्या जागा निर्वासितांना दिल्यानंतर त्यातील काही जागा अजूनही रिकाम्या आहेत वा शासकीय उपक्रमांसाठी राखीव आहे. मात्र, या जागांवर दावा करून त्यासाठी आवश्यक हस्तांतरणायोग्य बनावट कागदपत्रे तयार करून हस्तांतरण केले जाते. पुढे याच जागा शासकीय उपक्रमासाठी देत अधिकचा टीडीआर मिळवला जातो वा विक्री केली जाते. यात बीएसएनल व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या जागाही गिळंकृत करण्यात आल्याचा दावा भाजपच्या रामचंदानी यांनी केला आहे.
भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी
गेल्या काही वर्षात बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमिनी हस्तांतरण करणे, बनावट व्यक्तींच्या माध्यमातून भूसंपादन मोबदला लाटणे असे अनेक प्रकार स्थानिक उपविभागीय कार्यालयात झाले आहेत. याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच उपविभागीय आयुक्त कार्यालयाच्या सदन वाटप प्रकरणाचे चौकशीचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे हे कार्यालय चर्चेत आहे.
काही प्रकरणांवर आक्षेप असल्याच्या तक्रारी होत्या. यातील काही प्रकरणे वरिष्ठ कार्यालयांकडे विचाराधीन आहेत. शासकीय जागांवर केलेल्या मालकीच्या दाव्यांच्या प्रकरणांमध्ये कार्यालयाने नकारात्मक शेराच दिला आहे. बनावट कागदपत्रांची कार्यालयाच्या पातळीवरही चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणात सनद रद्द होऊ शकते. – विजयानंद शर्मा, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर.
