कल्याण – लोकलमध्ये चढण्यावरून झालेल्या बाचाबाचीमधून बदलापूर येथे राहत असलेल्या एका ६२ वर्षाच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला उल्हासनगर रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी एका तरूणाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने तक्रार केली आहे.बदलापूर येथील रुग्णालयात या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. उमाजी ईश्वर काळे (६२) असे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. काळे आपल्या कुटुंबीयांसह बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी भागात राहतात.

काळे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मंगळवारी सकाळी नऊ वाजता आपण पत्नी स्वाती काळे आणि नातीला पुणे कुर्डुवाडी येथे जायचे असल्याने त्यांना सोडण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकात आलो होतो. बंगळुर उद्यान एक्सप्रेस येण्यास एक तास उशीर झाला आणि उशिरा आलेल्या एक्सप्रेसला खूप गर्दी असल्याने पत्नी, नातीला या गर्दीतून जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना सोडण्यासाठी आपण पुणे येथे गेलो. पुणे येथे पत्नीला कुर्डुवाडीकडे जाण्यासाठी वाहनात सोडून आपण पुन्हा पुणे रेल्वे स्थानकातून नागरकोईल एक्सप्रेसने बदलापूर येथे येण्यास निघालो. आपण आठ वाजण्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात उतरलो.

कल्याणहून आपण बदलापूरला जाणारी लोकल पकडली. लोकलमध्ये खूप गर्दी होती. उल्हासनगर रेल्वे स्थानकात डब्यातील प्रवाशांना उतरण्यासाठी आपण खाली उतरलो. प्रवासी उतरल्यावर आपण पु्न्हा डब्यात चढू लागलो. त्यावेळी एका २५ वर्षाच्या तरूणाने आपणास ढकलून दिले आणि तो स्वता डब्यात चढला. आपण ड्ब्यात पुन्हा चढण्याचा प्रयत्न केला. आपणास पुन्हा डब्यात चढता आले नाही. या ढकलाढकलीवरून आपला त्या तरूणा बरोबर शाब्दिक वाद झाला. आपण गर्दीमुळे डब्यात चढलो नाही. मागील लोकल पकडून घरी जाऊ असा विचार केला.

आपल्याशी वाद घालणारा तरूणही लोकलमधून खाली उतरला. मी प्रथम श्रेणी डब्याच्या दिशेने जात होतो. त्यावेळी आपल्याशी शाब्दिक वाद घालणारा तरूण हातात लाकडी दांडका घेऊन माझ्या दिशेने पाठीमागून आला. त्याने आपल्या डोक्यासह सर्वांगावर फटके मारून आपणास रक्तबंबाळ केले. मारहाण करताना त्याच्या हातामधील काठी तुटली. त्यानंतर त्याने बाजुला पडलेला दगड उचलून तो आपणास मारण्याचा प्रयत्न केला.

तो दगड आपण चुकवला. या घटनेनंतर तो तरूण तेथून पळून गेलो. तेवढ्यात आपल्या जवळ लोहमार्ग पोलीस आले. त्यांनी घडल्या घटनेची माहिती घेतली. रक्तस्त्राव अधिक होत असल्याने आपण बदलापूर लोकल पकडून बदलापूरला आलो. मुलाला घडल्या घटनेची माहिती दिली. त्याने आपणास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मारहाण करणाऱ्या तरूणाला पकडून पोलिसांनी आपणा समोर उभे केले तर आपण त्याला नक्की ओळखू, असे निवृत्त पोलीस अधिकारी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.