उल्हासनगरः पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून नागरिकांचे मृत्यू आणि जखमी झाल्याचे प्रकार उल्हासनगर शहरात झालेले असतानाच आता पावसाळी खड्ड्यांनी शहरातील रस्त्यांची चाळण केली आहे. उल्हासनगरातील जवळपास सर्वच डांबरी रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असून त्यातून प्रवास करताना वाहनचाकांना कसरत करावी लागते आहे. जराही तोल गेल्यास चिखलात पडण्यासोबतच जखमी होण्याचीही भीती आहे. विशेष म्हणजे प्रभाग कार्यालयालाच खड्ड्यांचा वेढा असताानही ते भरले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
ऑनलाईन आणि इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता करून राज्यात महापालिका आयुक्तांमध्ये उल्हासनगर महापालिका आयुक्तांचा अव्वल क्रमांक आला. राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना गौरवण्यातही आले. त्यामुळे प्रशासकीय गोष्टींमध्ये कधी नव्हे तो बदल झाला. मात्र दरवर्षीप्रमाणे शहरात पडणारे खड्डे मात्र थांबू शकले नाहीत. यंदाच्या वर्षात पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात शहरातल्या जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरातून जाणारे राज्यमार्ग असो की अंतर्गत रस्ते असोत. सर्व रस्त्यांवर सध्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसतो आहे.
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर ज्या ज्या ठिकाणी डांबरी पट्टे आहेत तिथे आज खड्डे पडले आहेत. सोबतच शहरातील बाजारपेठा, अंतर्गत रस्ते, चौक खड्ड्यांनी व्यापले गेलेले आहेत. कॅम्प चार आणि पाच भागातही परिस्थिती वेगळी नाही. अंबरनाथ शहराच्या वेशीवरील प्रवेशद्वारापासूनच खड्ड्यांची मालिका सुरू होते. येथे असलेल्या वालधुनी नदी पुलावरही दोन्ही मार्गिकांवर खड्डे पडले आहेत. पुढे कुर्ला कॅम्प रस्त्यापासून स्वामी शांतीप्रकाश चौकापर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र पुढे खड्डे आहेत. स्वामी शांती प्रकाश (भाटीया) चौकात तर रस्ता औषधााही शिल्लक नाही. येथे खड्ड्यांसोबत चिखलही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. शेजारी प्रभाग समिती कार्यालय आहे. त्याच्या दोन्ही बाजुंना खड्ड्यांची रांगोळी पाहायला मिळते. याच रस्त्याने दररोज अधिकारी प्रवास करतात. त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पुढे नेताजी रस्ता, हिललाईन पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता आणि अन्य रस्त्यांवर एकतर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे किंवा डांबरी रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरातले उड्डाणपूल, जोडरस्तेही खड्ड्यांमुळे त्रासदायक ठरू लागले आहेत.

समाजमाध्यमांवर टीकेची झोड
शहरातील खड्डे, वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर उल्हासनगर महापालिकेवर टीकेची झोड उठवली जाते आहे. एका युट्युबरने शहरातल्या खड्ड्यांवर केलेला रॅप सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. कुलदिपसिंग लबाना या खात्यावरून हा रॅप प्रसारीत करण्यात आला असून ‘ ५०० मे बिक जाओगे ऐसे सडके पाओगे’, असा आशय त्यात आहे. त्यामुळे हा रॅप चर्चेत आहे.