उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ३ परिसरातील साई सृष्टी या अतिधोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील लोखंडी स्लॅबचा मोठा भाग बुधवारी अचानक कोसळला. सुदैवाने ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा तिथे नागरिकांची फारशी वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षेच्या कारणास्तव पालिका प्रशासनाने इमारतीखालील सर्व दुकाने तातडीने खाली करून इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सहाय्यक आयुक्त सलोनी नीमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. इमारतीची सद्यस्थिती आणि कोसळलेला स्लॅब पाहता संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या इमारतीचा वीजपुरवठा तत्काळ खंडित केला. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीच्या तळमजल्यावरील आणि आजूबाजूची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. जोपर्यंत या धोकादायक इमारतीचे पाडकाम पूर्णपणे मार्गी लागत नाही, तोपर्यंत परिसरातील कोणतीही दुकाने उघडता येणार नाहीत. या निर्देशांचे उल्लंघन करून जर कोणी दुकाने सुरू केली आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित दुकानदारांवरच राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यामुळे घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
साई सृष्टी ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होती. या इमारतीच्या रचनात्मक लेखापरीक्षण अहवालावरून प्रशासनाकडून यापूर्वीच लेखी नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे प्रशासनाला ज्ञात असतानाही, इमारतीचे पाडकाम करण्याची प्रक्रिया इतके दिवस का रखडली असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादी मोठी जीवितहानी किंवा अनर्थ घडण्याची प्रशासन वाट पाहत होते का असा जाबही स्थानिक विचारत आहेत. सुदैवाने आज कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेने प्रशासनाचे डोळे उघडणे गरजेचे आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उल्हासनगर शहरातील इतर मोडकळीस आलेल्या आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
