उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष आता विकोपाला गेला आहे. भाजपने शिवसेनेवर विश्वासघाताचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आरोप करत स्थानिक पातळीवर युती तोडण्याची घोषणा केली होती. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता शिवसेनेनेही जशास तसे उत्तर दिले आहे. शिवसेनेचे नेते आणि महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच निशाणा साधला आहे. जर पप्पू कलानी यांना गँगस्टर म्हटले जात असेल तर रवींद्र चव्हाण हे एकेकाळी कुप्रसिद्ध मंचेकर टोळीशी संबंधित होते, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, असा सणसणाटी आणि खळबळजनक आरोप कमलेश निकम यांनी केल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.
भाजपने युती तोडण्याची घोषणा करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, भाजपला अधिकृत उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील संपर्क कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर, उल्हासनगर महापालिकेच्या शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण आशान, शिवसेना नेते राजेंद्र चौधरी, राजेंद्र सिंह भुल्लर, रमेश चव्हाण, कलवंत सिंग सोहता आणि पंचम कलानी यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपवर टीका करताना कमलेश निकम यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. भाजपने शिवसेनेच्या नगरसेवकांवर गुन्हेगारीचे खोटे आरोप करण्यापूर्वी आपल्याच उमेदवारांची पार्श्वभूमी तपासावी. स्वीकृत नगरसेवकपदाचा अर्ज दाखल करणारे भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यावर पालिकेत फाईल चोरीचा, तर कपिल अडसूळ यांच्यावर चक्क घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. म्हणूनच प्रशासनाने या दोघांचे अर्ज कायदेशीर प्रक्रियेत बाद केले आहेत, असे निकम यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर, स्थानिक भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. आमदार आयलानी हे उल्हास नदीकाठी असलेल्या अँटालिया येथे काही धनदांडग्या बिल्डरांच्या हितासाठी बेकायदेशीर पर्यटन स्थळ उभारण्याचा घाट घालत आहेत, असा आरोपही निकम यांनी केला.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान यांनी भाजपला इशारा दिला. भाजपने केलेले सर्व आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे आहेत. या प्रकरणांची राज्य शासनाने निष्पक्ष चौकशी करावी. आता भाजपनेच युती तोडल्याचे जाहीर केल्याने, जिथे जिथे भाजपचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या विरोधात शिवसेना आपली पूर्ण ताकद पणाला लावून काम करेल, असा इशारा आशान यांनी दिला.
याचवेळी अंबरनाथ विधानसभेचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तोफ डागली. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी माझ्या विरोधात उघडपणे काम केले होते. यासंदर्भातील सर्व सबळ पुरावे माझ्याकडे सुरक्षित असून, योग्य वेळ आल्यावर ते मी नक्कीच उघड करीन, असा इशारा डॉ. किणीकर यांनी दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगरमधील या ताज्या राजकीय घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, एकमेकांवर थेट गुन्हेगारीचे आणि टोळीयुद्धाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने स्थानिक राजकारणाने अत्यंत नीचांकी पातळी गाठली आहे. या स्थानिक संघर्षाचे पडसाद आगामी काळात महायुतीच्या राज्यस्तरीय राजकारणावर कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने थेट रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका झाल्याने भाजपनेही तत्काळ प्रत्युत्तर दिले. भाजपचे गटनेते राजेश वधारीया यांनी पप्पू कलानी यांच्यासह विविध व्यक्तींवर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांची माहितीच दिली. आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करत असून त्यांना आमच्या निर्णयाची पूर्ण कल्पना दिली आहे. रविंद्र चव्हाणांवर बोलण्याची पात्रता नसलेले त्यांच्यावर टीका करत आहेत, असेही वधारिया यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
