कल्याण : उल्हासनगरमधील ओ. टी. सेक्शनमधील संत कवरराम पॅलेसमधील एकूण ४६ रहिवाशांनी सोसायटीतील वीज मीटरमध्ये महावितरणच्या रस्त्याकडेच्या मीनी पिलरमधून थेट चोरून विद्युत पुरवठा घेतला. आपल्या गृहसंकुलाला नियमबाह्यपणे, चोरून वीज पुरवठा घेऊन महावितरणच्या विजेचा वर्षभरात ६५ हजार वीज युनिट्सचा वापर केला. या वीज चोरीप्रकरणी संत कवरराम पॅलेसने एकूण १२ लाख २० हजार रूपयांची वीज चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.

चोरून वीज पुरवठा घेऊन महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याने महावितरणच्या वाशी येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कपील गाठले यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात या वीज चोरी प्रकरणी भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये कवरराम पॅलेसचे वीज ग्राहक हर्ष वाशुमल खानवाणी, या इमारतीचे पर्यवेक्षक अलिम इब्राहिम पठाण यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरमधील ओ. टी. सेक्शन येथील संत कवरराम पॅलेस येथे गृहसंकुलाच्या वीज मीटरमध्ये रस्त्यावरील महावितरणच्या वीज पुरवठ्यातून थेट वीज पुरवठा घेतला जात आहे. याठिकाणी वीज चोरी सुरू असल्याची माहिती वाशी येथील महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली होती. या पथकाने गेल्या वर्षी सकाळी कवरराम पॅलेसमध्ये छापा मारला. तेथील वीज मीटर आणि वीज पुरवठ्याची माहिती घेतली. त्यावेळी गृहसंकुलाच्या वीज मीटरला रस्त्यावरील महावितरणच्या मीनी पीलरमधून वीज पुरवठा घेतला असल्याचे आढळले. हा वीज पुरवठा सोसायटीतील ४४ सदस्यांचा घरात करण्यात येत असल्याचे आढळले.

पथकाने या सोसायटीतील प्रत्येक घरात जाऊन तेथील वीजेवर चालणाऱ्या उपकरणांची माहिती घेतली. त्यावेळी या गृहसंकुलातील रहिवाशांनी ऑक्टोबर २०२४ पासून वर्षभराच्या कालावधीत ६५ हजार वीज युनिटसचा वापर केला असल्याचे आढळले. या वीज चोरीतून महावितरणचे वीज देयक शुल्काच्या माध्यमातून एकूण १२ लाख २० रूपये वीज देयकाची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले होते. तडजोडीने दोन लाख ५९ हजार रूपये कवरराम पॅलेसच्या वीज ग्राहक, पर्यवेक्षकाला भरण्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईत अतिरिक्त कार्यकारी अभियंता कपील गाठले, उप कार्यकारी अभियंता देवेंद्र नलावडे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रदीप फराड, प्रफुल्ल राऊत सहभागी झाले होते.

ग्रामीणमध्ये वाढती वीज चोरी

बहुतांशी वीज चोरी करणारे ग्राहक संध्याकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत घरातील वीज मीटरला आकडी लावून किंवा घरासमोरील वीज वाहक तारांवरून घरात वीज पुरवठा घेत असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. महावितरणच्या भरारी पथकाने संध्याकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत गावात अचानक वीज मीटर, वीज पुरवठा तपासणी मोहीम सुरू केली तर अधिक प्रमाणात वीज चोरी पकडली जाण्याची शक्यता आहे. अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज चोरीची गुप्त माहिती दिली तरी ते चोरीच्या ठिकाणी वेळेत जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तत्पूर्वीच वीज चोरी करणारा ग्राहक सावध होत असल्याने महावितरणची कारवाई अपयशी होत आहे. शहापूर तालुक्यातील एका गावात असा प्रकार काही दिवसापूर्वी घडला होता.