उल्हासनगर: अंबरनाथ ते उल्हासनगर दरम्यान शनिवारी रात्री एका भरधाव आणि अनियंत्रित कारच्या थरारक प्रवासाने खळबळ उडवली. रस्त्यावरून बेदरकारपणे धावणाऱ्या या कारने अनेक वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर फॉलोवर लाईन चौकात कारला घेराव घालून तिची तोडफोड केली. मात्र, निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

अंबरनाथहून उल्हासनगरच्या दिशेने येणाऱ्या या कारचा वेग प्रचंड होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते आणि तो समोर येईल त्याला धडक देत पुढे सरकत होता. या अपघातात काही नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारच्या या हैदोसामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांमध्ये आणि इतर वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

कारने अनेकांना उडवल्याचे पाहताच संतप्त झालेल्या नागरिकांनी फॉलोवर लाईन चौकात कारला अडवून चहूबाजूंनी घेरले. नागरिकांचा वाढता संताप पाहून चालकाने प्रसंगावधान राखत कारमधून उतरून पळ काढला. चालक पसार झाल्याने नागरिकांचा उद्रेक अधिकच वाढला आणि त्यांनी महामार्गावरच कारची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या तोडफोडीत कारच्या मागील काचेचे आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून पोलिसांनी सर्व फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीच्या क्रमांकाच्या आधारे फरार चालकाची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.