मुंबई: उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला विशेष बाब म्हणून एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेतला आहे. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३ मुळे राज्यभरात मुद्रांक शुल्क व दंडाशी संबंधित अनेक प्रकरणांचा निपटारा होऊन सरकारला मोठा महसूल मिळाला होता. मात्र, उल्हासनगर शहरात विहित वेळेत अर्ज दाखल करूनही अनेक प्रकरणे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न होणे, पूरक माहितीस विलंब किंवा अन्य प्रक्रियात्मक कारणांमुळे प्रलंबित राहिली होती.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणांचा निपटारा होऊन नागरिकांना दिलासा मिळावा आणि शासनास महसूल प्राप्त व्हावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या काळात नवीन अर्ज करता येणार नाही तसेच नवीन प्रकरणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांनी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना अंतर्गत विहित कालावधीत अर्ज दाखल केला होता आणि ज्यांचे प्रकरण मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे त्यांनाच एक महिन्याचा वाढीव कालावधी मिळणार आहे.
हा निर्णय केवळ उल्हासनगर शहरातील प्रलंबित प्रकरणांसाठी एक ‘विशेष बाब’ म्हणून घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील इतर कोणत्याही कार्यालयातील प्रकरणांना याचा लाभ मिळणार नाही असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले असून मुद्रांक जिल्हाधिकारी, ठाणे (ग्रामीण) यांनी या ३० दिवसांच्या कालावधीत सर्व पात्र प्रलंबित प्रकरणांची कार्यवाही पूर्ण करून त्याचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक आणि महसूल विभागाला सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
