उल्हासनगर : सावत्र बहिणीचे नाव सातबारावर चढवून फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडले. द्वारली-ढोकळी येथील तलाठी कार्यालयात झालेल्या या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. ईश्वर जाधव असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सावत्र बहिणीचे नाव वारस म्हणून सातबारावर नोंदवायचे होते. हा फेरफार मंजूर करण्यासाठी जाधव याने स्वतःसाठी १० हजार आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी १० हजार अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २९ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे कार्यालयात या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाने तातडीने कारवाईचे चक्र फिरवले. द्वारली येथील तलाठी कार्यालयात शुक्रवारी दुपारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाधव याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची पूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून तपासासाठी मोबाईल फोनही जप्त केला आहे.

या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीच्या घराची झडतीही घेतली जात आहे. ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, सुनील केदार आणि रेखा शिंदे यांच्या पथकाने केली.