डोंबिवली – कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील बंद घरे, दुकाने, हाॅटेल्स मध्यरात्रीच्या सुमारास फोडून तेथून लाखो रूपयांचा ऐवज आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरून नेणारा उल्हासनगर मधील एका चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. कल्याण पूर्वेतील चोरीची घटना घडल्या ठिकाणापासून ते आरोपीच्या उल्हासनगर घरापर्यंतचे एकूण ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफिती तपासून पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर भागात मागील काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील हाॅटेल्स, दुकाने फोडून तेथील रोख रक्कम, किमती माल, घरातील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम चोरट्यांकडून चोरून नेली जात होती. गेल्या आठवड्यात कल्याण पूर्वेतील नेतिवली नाका भागातील हाॅटेल मालक मोमीन शेख यांचे हाॅटेल्स रात्रीच्या वेळेत फोडून चोरट्यांनी हाॅटेलमधील ग्राहक सेवेतून मिळालेली रोख रक्कम चोरून नेली होती. यावेळी चोरट्यांनी हाॅटेलच्या मुख्य दरवाजाचे शटर तोडले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात मोमीन शेख यांनी तक्रार केली होती.

पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने हाॅटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये एक इसम मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करून हाॅटेलमध्ये घुसत असल्याचे दिसले. पोलिसांनी कल्याण पूर्व नेतिवली येथील हाॅटेल परिसर ते उल्हासनगर राहूलनगरपर्यंतच्या रस्त्यावरील एकूण ९५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यांना चोरटा याच मार्गाने उल्हासनगरमध्ये चोरी करून दिसून आल्याचे चित्रफितीत दिसले. पोलिसांनी या चित्रफितीमधील इसमाची ओळख पटवली. तो उल्हासनगरमधील अनिल संजू रूपवते (२०) असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस त्याचा शोध घेत होते. गुप्त माहितीगाराने पोलिसांना कळविले की अनिल रूपवते हा कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात येणार आहे.

पोलिसांनी चक्कीनाका भागात सापळा लावून अनिल रूपवते याला शनिवारी अटक केली. त्याने आपला साथीदार संजू किसन वाघारी याच्या साथीने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरात घरफोड्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने एकूण सात गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी रूपवते याच्याकडून दोन लाखाहून अधिक किमतीचे १२ मोबाईल फोन, एक दुचाकी, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला.

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलिस निरीक्षक जयपालसिंह राजपूत, साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल पवार, सुशांत पाटील, संजू मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, केशव भोये, योगेश आडे, महेश झांजुर्णे, अशोक आहेर, विजय आव्हाड, शेळके यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाणे, हिललाईन, कोळसेवाडी, टिळकनगर आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अनिल रूपवते याला पकडण्यासाठी प्रयत्नशील होते. न्यायालयाने अनिल रूपवते याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संजू वाघरी अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.