उल्हासनगर : शहरातील गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उल्हासनगरातील पालिका शाळांचे आता रूप पालटणार आहे. अत्याधुनिक आणि सुरक्षित इमारतींच्या अभावी पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील तीन प्रमुख महापालिका शाळांच्या संपूर्ण पुनर्बांधणीसाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शाळांचा पुनर्विकास होणार आहे.

सध्याच्या काळात खासगी शाळांच्या वाढत्या फीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आजही महापालिकेच्या शाळांचाच मोठा आधार असतो. मात्र, अनेक पालिका शाळांच्या इमारती जुन्या आणि मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि गळतीचा प्रश्न निर्माण झाला होता. उल्हासनगर शहरात महापालिकेच्या २१ शाळा आहेत. त्यात सुमारे साडे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात ८ मराठी, १२ हिंदी आणि एका गुजराती शाळांचाही समावेश आहे. शहरातील शाळांची पाहणी यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वतीनेही करण्यात आली होती. शाळांची पुनर्बांधणी करून त्या आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येतील असे आश्वासन स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. मात्र त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात उल्हासनगर महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यही वेळेत मिळू शकले नव्हते. अशा स्थितीत पालिकेच्या काराभारावर टीका केली जात होती. मात्र आता शाळांच्या पुनर्बांधणीसाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे.

या पालिका शाळांचा विकास

या १७ कोटींच्या निधीतून शहरातील तीन अत्यंत महत्त्वाच्या शाळांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यामध्ये बिर्ला मंदिराजवळ असलेल्या मनपा शाळा क्र. २३/२६ या शाळेसाठी ५ कोटी ७७ लाख ५ हजार ४३० रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच, पवई परिसरातील हिरा घाट जवळील मनपा शाळा क्र. ९/२१ च्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी १५ लाख ९३ हजार ४८४ रुपये, तर उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील सिंधू युथ सर्कल येथे असलेल्या मनपा शाळा क्र. ७ च्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटी ९९ लाख ७५ हजार ४९२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याआधी अंबरनाथ नगर परिषदेतील काही शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून पुनर्विकास करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता उल्हासनगरमधील पालिका शाळांचा विकास साधला जाणार आहे.

प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात

नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील इतर शाळांच्या पुनर्विकासासाठी सुमारे १०० कोटींचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उल्हासनगरमधील या तिन्ही शाळांच्या पुनर्बांधणी प्रकल्पांसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने देण्यात आली आहे. या नव्या सुविधांमुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल आणि शिक्षणातील सामाजिक दरी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.