उल्हासनगर: महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी खरेदीला जाणार असाल तर तुम्हाला खिशात रोख रक्कम बाळगावी लागणार आहे. कारण व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर हा दिवस नो युपीआय दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या युपीआय व्यवहारांवर नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या ०.४ टक्के एमडीआर शुल्काच्या विरोधात उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार, उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापारी २ ऑक्टोबर रोजी ‘नो युपीआय डे’ पाळणार आहेत. या दिवशी शहरातील सर्व व्यापारी आपल्या दुकानांतील युपीआय स्कॅनरवर काळे कापड झाकून या निर्णयाचा लाक्षणिक निषेध करणार असून, ग्राहकांकडून युपीआयद्वारे कोणतेही पेमेंट स्वीकारले जाणार नाही.
येत्या १५ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांच्या पुढील युपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर शुल्क लागू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या नफ्यावर गदा येणार असून त्यांच्यावर मोठा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याने देशभरातील व्यापारी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच देशव्यापी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांनीही या लाक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनांतर्गत २ ऑक्टोबरला व्यापारी युपीआयच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करणार नाहीत. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी या दिवशी खरेदीचे मूल्य रोख स्वरूपात, बँक खात्यात पैसे पाठवणे किंवा चेकच्या माध्यमातून अदा करावे, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, व्यापाऱ्यांचा हा विरोध डिजिटल पेमेंट प्रणाली किंवा युपीआयला अजिबात नाही. आमचा विरोध केवळ दोन हजार रुपयांवरील व्यवहारांवर अन्यायकारक पद्धतीने लादण्यात येणाऱ्या एमडीआर शुल्काला आहे. शासनाने १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हा प्रस्तावित निर्णय तत्काळ मागे घ्यावा आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी थांबवावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक एकजूट दाखवत २ ऑक्टोबर रोजी आपापल्या दुकानांतील स्कॅनरवर काळे कापड टाकून या लाक्षणिक आंदोलनात १०० टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहनही अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केले आहे.
