उल्हासनगर: उल्हासनगरकरांना दैनंदिन प्रवासात भेडसावणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या त्रासातून कायमचा दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार ठप्प होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने शहरातील पाच प्रमुख मार्गांवर २४ तास ”नो-पार्किंग”चा नियम लागू केला आहे. विशेष म्हणजे, ही नवीन व्यवस्था सुरुवातीला ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून, त्यानंतर नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आणि सूचनांच्या आधारे याबाबतचा अंतिम व कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

उल्हासनगरमधील दिवसेंदिवस वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. वाहतूक पोलिसांच्या अंतर्गत निरीक्षणानुसार, उल्हासनगर पूर्व परिसरातील अनेक मुख्य मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केली जाणारी अनिर्बंध वाहनांची पार्किंग आणि अनधिकृत व्यावसायिक वाहने यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडत होती. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी नोकरदार आणि सामान्य नागरिकांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागत होते. या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अखेर हे नवे निर्बंध लागू केले आहेत.

या अधिसूचनेनुसार शहरातील पाच अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये भीम कॉलनी परिसरातील गुलशन ज्यूस सेंटर ते सत्कार बार अँड रेस्टॉरंट दरम्यानचा २०० मीटरचा परिसर, कृभणा डेअरी ते पांडुरंग बॅण्ड पार्क आणि पुढे सक्सर चर्चकडे जाणाऱ्या मार्गावरील ३०० मीटरचा टप्पा, तसेच बालाजी ताडी माडी सेंटर ते सत्यम सुपर मार्केट दरम्यानच्या ५० मीटर अंतराचा समावेश आहे. याशिवाय, सर्वाधिक वर्दळीच्या कामेश्वर महादेव मंदिर ते उल्हासनगर पूर्व रेल्वे स्थानक या ३०० मीटरच्या मार्गावर आणि चंद्रमणी बुद्ध विहार ते मद्रासी पाडा व जरी मरी माता मंदिर परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर २४ तास नो-पार्किंग पाळणे आता बंधनकारक असणार आहे.

यातील कामेश्वर महादेव मंदिर ते रेल्वे स्थानक दरम्यानच्या मार्गावरील कोंडी ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. या भागात उभारण्यात आलेल्या स्कायवॉकच्या खांबांमुळे मुख्य रस्ता आधीच अरुंद झाला आहे, त्यात भर म्हणून दुतर्फा होणाऱ्या पार्किंगमुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होता. त्यामुळे या विशिष्ट मार्गावरील नो-पार्किंगचा निर्णय येथील कोंडी फोडण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी या व्यवस्थेबाबत हरकती नोंदवण्याची संधी दिली आहे. पुढील ३० दिवसांच्या चाचणी कालावधीत स्थानिक नागरिकांना, वाहनचालकांना किंवा दुकानदारांना या नियमाबाबत काही आक्षेप अथवा सुधारणा सुचवायच्या असल्यास, त्यांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.