Congestion In Ulhasnagar City: उल्हासनगर हे व्यापारी शहर म्हणून परिचित आहे. दररोज हजारो वाहने, लाखो व्यापारी आणि ग्राहक शहरात येजा करत असतात. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळही मोठी असते. नुकत्याच उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत. यामध्ये महत्त्वाच्या दोन पक्षांना समसमान जागा मिळाल्याने येथे सत्ता स्थापनेमध्ये चुरस पाहायला मिळते आहे. शहरातील नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये आश्रयाला आहेत. तर त्यांचे वरिष्ठ हे सत्तेची समीकरणे जुळवण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शहरातील वाहतूक कोंडीची समस्या उग्ररूप धारण करते आहे.
उल्हासनगर शहरातून जाणारा महत्त्वाचा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग सध्या वाहतूक कोंडीने व्यापला आहे. या महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा होत असल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या काँक्रीट रस्त्यावरच दुसऱ्या काँक्रीटचे थर टाकले जात आहेत. बहुतांश भागात एका मार्गिकेतील निम्मा भाग काँक्रीटचा करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित भागातून वाहतूक सुरू आहे.
परिणामी उल्हासनगर शहराचे अंबरनाथ दिशेचे प्रवेशद्वार असलेले फॉरवर्ड लाईन, शिवाजी महाराज चौक, १७ सेक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आहे. त्यात रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी राहत असल्याने अगदी चिंचोळा रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो आहे. त्या चिंचोळ्या मार्गातून वाहन काढत असताना वाहन चालकांची कसरत होते आहे. त्यामुळे येथे तासन्तास वाहने अडकून पडत आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास खर्ची घालावे लागत आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोणत्याही नियोजनाशिवाय रस्ते काम सुरू असल्याने वाहन चालकांना त्याचा फटका बसतो आहे.
शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका कोंडीत
उल्हासनगर शहरातील अनेक विद्यार्थी आणि रुग्णवाहिका या मार्गावर वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्याचा उशीर होतो आहे तर रुग्णाचे नातेवाईक कोंडीत अडकल्याने चिंतेत असतात. या कोंडीवर व्यवस्थापनाचा दिलासा द्यावा अशी मागणी आता होते आहे.

