उल्हासनगरः व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरात ऐरवी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आता सण उत्सवांच्या निमित्ताने आसपासच्या शहरांसह तालुक्यांतून मोठ्य संख्येने ग्राहक आणि व्यापारी उल्हासनगरात येणार आहेत. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य मार्गावरील कोंडी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर शहराच्या दोन्ही दिशेच्या प्रवेशद्वारांपासून होणारी कोंडी आता वाहनचालकांसह व्यापाऱ्यांसाठीही डोकेदुखी ठरते आहे. उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. शहरांतर्गत वाहतुकीसह कल्याण ते बदलापूर आणि पुढे भिवंडी, ठाणे, मुंबई प्रवासासाठीही या मार्गाचा वापर होतो. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. सध्या या कल्याण बदलापूर राज्यमार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

या मार्गावरील अडथळे जैसे थे असून त्यातही अनेक ठिकाणी चौकांमध्ये रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतुक कोंडी वाढली आहे. उल्हासनगर शहरात अंबरनाथमधून प्रवेश करत असतानाच खराब रस्त्याने सुरूवात होते. पुढे फॉलोवर लाईन चौकात कॉंक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने येथे वाहतूक कोंड होते. शहरात प्रवेश करताच अवघ्या १०० मीटर अंतरावर ही कोंडी होत असल्याने मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या कोडींमुळे डावीकडे उल्हासनगर रेल्वे स्थानकाकडे तर उजवीकडे मध्यवर्ती रूग्णालयाकडे जाणारी वाहतूक खोळंबते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या अलीकडे असणाऱ्या डावीकडच्या मार्गातही अशीच कोंडी होते.

पुढे चौकात असलेल्या मिठाईच्या दुकानांबाहेर अनेक जण चारचाकी वाहने उभी करून खरेदीसाठी जातात. येथे वाहतूक पोलिसांचा कारभार निष्प्रभ ठरतो. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या तीन पदरी रस्त्यावर अवघी एक वाहन जाईल इतकीच जागा उरते. परिणामी मागे कोंडी वाढते. पुढे सतरा सेक्शन चौक ते शांतीनगर या भागात रस्त्यावर केली जाणारी वाहन दुरूस्ती, वाहन सजावट, वाहन विक्री दुकानांमध्ये येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला जातो आहे. त्यामुळे येथे कोंडीत होते आहे.

सण उत्सवांपूर्वी कोंडी फोडण्याचे आव्हान

गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या सण उत्सवांच्या खरेदीसाठी लाखो ग्राहक, व्यापारी उल्हासनगर शहरात येत असतात. कच्च्या मालाच्या, पक्क्या मालाची वाहनेही शहरात येजा करत असतता. अशावेळी गर्दी वाढते. मात्र सध्या कोंडीने शहराला ग्रासले आहे. त्यामुळे ऐन उत्सवांच्या काळात मिरवणुका, खरेदी, वाहनांच्या गर्दीने यात भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारीही चिंतेत आहेत. या कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी आता होते आहे.