उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात महायुतीमधील पक्षांमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना गळाला लावले आहे. तर त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जुने पदाधिकारी आणि अजित दादांच्या ठाणे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांनाही शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते आहे. मात्र भाजपचे दोन्ही नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचेच असून ते स्वगृही परतले आहेत, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिका ही कल्याण लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी उल्हासनगर महापालिका महत्वाची आहे. २०१९ मध्ये मोठी राजकीय खेळी करत येथे शिवसेनेने भाजपच्या तोंडातून महापौरपदाचा घास हिसकावला होता. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात युतीत असले तरी येथे शिवसेना आणि भाजप यांच्यातच सर्वात मोठी लढाई होणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्षाला यंदा कलानी गटाची साथ मिळाली आहे. याच कलानी गटाने गेल्या पालिका निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेत ते भाजपसोबत आहेत. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कलानी गटाने भाजपला हादरे देण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेना महायुतीत असल्याने थेट भाजपला धक्का देत नव्हती. मात्र गुरूवारी झालेल्या दोन माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच धक्का दिला आहे. भाजपज्या माजी नगरसेविका मीना सोंडे आणि किशोर वनवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या दोघांनी गेली निवडणूक भाजपातर्फे लढवली होती. त्यामुळे या दोघांचा प्रवेश भाजपसाठी आव्हानात्मक बनला आहे. येत्या काळात आणखी काही भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेच येण्याची चर्चा सध्या उल्हासनगर शहरात रंगली आहे.
तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने पदाधिकारी, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भरत(भाऊ) गोंधळे यांनीही गुरूवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीण मधील शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर सहकार क्षेत्रातील निवडणुकांसाठी गोंधळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेला फायदा होण्याची आशा आहे. महायुतीतील थेट अजित पवार यांच्याच पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्याला प्रवेश दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला.
भाजपचे दोन माजी नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आपल्या घरी परतले आहेत. येत्या काळात शिवसेनेत आणखी प्रवेश होणार असून महापालिका निवडणुकीत त्याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल. – अरूण आशान, कल्याण उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.
