उल्हासनगर: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना उल्हासनगरातील वालधुनी नदीच्या स्वच्छतेचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी नदीपात्रातून बाहेर काढलेला गाळ आणि कचरा तब्बल दहा महिन्यांपासून नदीकिनारीच सडत पडला असून, यामुळे प्रशासनाच्या नदी स्वच्छता मोहिमेचे वाभाडे निघाले आहेत. एकीकडे वालधुनीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा केली जात असताना, प्रत्यक्षात मात्र बाहेर काढलेला कचरा उचलण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही.

या उदासीनतेमुळे यंदाच्या पावसाळ्यात नदीपात्रात पुन्हा कचरा जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा आणि परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये प्रशासनाने मोठ्या गाजावाजात वालधुनी नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यावेळी पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक, झाडाझुडपे आणि इतर घनकचरा बाहेर काढण्यात आला. मात्र, हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर किंवा योग्य ठिकाणी वाहून नेण्याऐवजी तो नदीच्या किनाऱ्यावरच तसाच टाकून देण्यात आला.

तब्बल दहा महिने उलटून गेल्यानंतरही हा कचरा तिथेच पडून असल्याने आता तो पूर्णपणे कुजू लागला आहे. या सडलेल्या कचऱ्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, कीटक आणि संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार स्थानिक रहिवासी करत आहेत. विशेषतः नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.

पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची भीती

दरवर्षी पावसाळ्यात वालधुनी नदीला येणाऱ्या पुरामुळे उल्हासनगर आणि परिसरातील नागरिकांचे नुकसान होते. यंदा पावसाळा तोंडावर आलेला असताना किनाऱ्यावर पडलेला हा शेकडो टन सडलेला कचरा पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा नदीपात्रात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास नदीचा प्रवाह अडवला जाऊन पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही नदीची स्थिती ”जैसे थे”च राहणार असल्याचे चित्र आहे.

सध्या शहरात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नालेसफाई आणि नदी स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र मागील वर्षीचाच कचरा अद्याप उचलण्यात आलेला नसल्याने, आता नव्याने काढल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रशासन काय करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नदी स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदी कारवाई न करता पात्रातून काढलेल्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.