उल्हासनगर: उल्हासनगर शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाण्यावरील महागडे अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वतंत्र जलस्त्रोत निर्मितीचा निर्णय उल्हासनगर महापालिकेने घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अमृत २.० अभियानाअंतर्गत स्वतःचा स्वतंत्र जलस्त्रोत आणि वितरण व्यवस्था विकसित करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत तब्बल १७४ कोटी आहे. यामुळे शहराला हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उल्हासनगर शहराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. या पाण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला महिन्याकाठी तीन ते चार कोटी रूपये मोजावे लागतात. गेल्या काही वर्षात उल्हासनगर महापालिकेने एमआयडीसी प्रशासनाला मासिक बिलात पैसे अदा करताना हात आखडता घेतला. त्यामुळे सुमारे ६०० कोटींची निव्वळ थकबाकी आणि त्यावर अतिरिक्त व्याज अशी कोट्यावधींची थकबाकी उल्हासनगर महापालिकेकडे आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेला स्वतःचा जलस्त्रोत असावा, ज्यावर शहरासाठी पाणी पुरवठा योजना राबवून स्वतचे पाणी स्वतः शुद्ध करून वितरीत करता येईल, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काम करत होते.

मंजुरीनंतर पालिका प्रशासनाने नुकतीच या कामासाठी निविदा जाहीर केली आहे. त्यानुसार यात विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यात १६२ दशलक्ष लीटर क्षमतेचे अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या एकाच कामासाठी सुमारे ३५.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच म्हारळ येथे उल्हास नदीवर पाण्याचा उपसा करण्यासाठी नवीन विहिर (इंटेक वेल), जॅक वेल आणि पंप हाऊसचे बांधकाम करण्यात येईल. येथे १०० अश्वशक्ती क्षमतेची पंपिंग यंत्रणा बसवली जाईल.

मुख्य स्त्रोतापासून उल्हासनगर आणि म्हारळच्या मागीच बाजूस असलेल्या डोंगरावर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अशुद्ध पाणी आणण्यासाठी ३.१० किलोमीटर लांबीची आणि १हजार ५२४ मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येईल. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रातून संपूर्ण उल्हासनगर शहरात शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी १६५० ते ५०८ मिमी व्यासाची तब्बल १० किलोमीटर लांबीची मुख्य वाहिनी टाकली जाईल. या शुद्ध पाण्याच्या वाहिनीसाठी सर्वाधिक ५३.४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

जलवाहिनी टाकताना वाहतुकीला किंवा रेल्वेला अडथळा होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी ३ ठिकाणी सुक्ष्म बोगदे पुशिंग या विना-खोदकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे आधुनिक असेल. जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाक्यांचे काम स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी ९.९० कोटी रुपयांची तरतूद आहे. विशेष म्हणजे, विजेची बचत करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावर ३०० केडब्ल्यूपी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या १७४ कोटी रुपयांच्या महाप्रकल्पामुळे उल्हासनगरमधील पाण्याचा तुटवडा आणि अपुरा दाब यासारख्या समस्या कायमच्या निकाली निघणार असून, पालिकेलाही एमआयडीसीला पैसे अदा करावे लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल अशी आशा आहे.