कल्याण : आपल्या घरातील जमिनीखाली गुप्त धन आहे ते काढून देतो. तसेच, आपल्या घरात पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगून उल्हासनगरमधील एका महिलेकडून सहा लाख रुपये उकळणाऱ्या दोन मांंत्रिक व त्यांच्या तीन साथीदारांविरोधात हिललाइन पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर ५मधील सेक्शन ३६ मध्ये स्वामी शांती प्रकाश आश्रमाजवळील तुकाराम पाटील चाळीत राहणाऱ्या रेखा सुनील भोईर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उल्हासनगरमधील रहिवासी बब्बू गुरु, पम्मी गुरु, गणेश पवार, गीता जाधव व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रेखा भोईर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मी माझे सासरे घरात पूर्वीपासून खंडोबा देवाची पूजा करत होते. आपण जेजुरी, काळुदेवी येथे नियमित दर्शनासाठी जात होतो. त्याचे नित्य पाठ घरात करत होतो. त्यामुळे आपल्या स्वप्नात सतत देव येत असत. या सततच्या विचाराने आपल्या तब्येतीवर परिणाम झाला. आपण हा विषय आपली परिचित गीता जाधव यांना सांगितला.

याविषयी उपाय करण्याच्या विचाराने गीता यांनी आपली ओळख बब्बू गुरु यांच्याशी करून दिली. त्यांनी आपल्या घरात कोणते देवस्थान आहे ते पाहुनच योग्य निर्णय घेता येईल असे सांगितले. रेखा यांच्याजवळ साडे चार लाखाची पुंजी होती. त्यात मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तजवीज केली होती.

गीता जाधव यांच्या उपस्थितीत रेखा भोईर यांनी बब्बू गुरु यांच्या घरी भेट घेतली. त्यांनी तुझ्या घरी यलम्मा देवीचा जोगवा मागण्यासाठी चार लाख रुपये व सहा तोळे सोने द्यावे लागेल. तेव्हा मी तुझ्या घरी पूजा करीन असे सांगितले. आपल्याकडे एवढे पैसे, सोने नसल्याचे रेखा यांनी स्पष्ट केले. जानेवारीत रवी मिसाळ, वैशाली श्रीसुंदर असे आम्ही घरी होतो. पती बाहेर गेले होते. त्यावेळी बब्बू गुरु व दोन व्यक्ती आपल्या घरी आल्या. त्यांनी खंडोबाच्या नावाने घरात नारळ फोडला. आपणास आशीर्वाद दिला. आणि भंडारा पाण्यातून पिण्यास दिला. आपण ठीक होऊ सांगितले. त्यानंतर आपण बब्बू गुरु सांगितले त्याप्रमाणे वागू लागलो.

बब्बू गुरु सांगितले त्याप्रमाणे घरातील चार लाख रोख रक्कम, सहा तोळे सोन्याचे दागिने, ३५ हजार रुपये पूजेच्या साहित्यासाठी दिले. त्यानंतर इतर आवश्यक गोष्टींची मागणी करून त्या न दिल्यास ५२ हजार रुपये दंड द्यावा लागेल, असे सांगून गुरु निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे.

एक दिवस बब्बू, पम्मी गुरु, गणेश पवार आपल्या घरी रात्री आले. त्यावेळी गीता जाधव उपस्थित होती.

आपल्या घरी यलम्मा देवीचा जोगवा करण्यासाठीचा विधी करण्यात आला. पहाटेपर्यंत हा विधी सुरू होता. घरातील जमिनीत चार मडकी, तांब्याच्या वस्तू पुरण्यात आल्या. या पूजेसाठी विवस्त्र बसले तर घरात पैशाचा पाऊस पडेल. गुप्त धन मिळेल असे आमिष मांत्रिकाने दाखवले. तक्रारदार महिलेने ते नाकारले. दोन महिन्यांनी तक्रारदार रेखा यांनी बब्बू यांच्याकडे चार लाख रुपये व सोने तोळे सोने परत मागण्यास सुरुवात केली. त्यांनी आपणास घरात पुरलेल्या वस्तू बाहेर काढल्या तर घरातील माणूस मरून जाईल अशी भीती घातली.

या सर्व प्रकाराने रेखा यांना शारीरिक, मानसिक त्रास सुरू झाला. एक दिवस गणेश पवार रेखा यांच्या घरी आले. खंडोबा मंदिराखाली पुरलेले मडके काढून घेऊन गेले. बाकी वस्तू तशाच ठेवल्या. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गुन्हा दाखल इसमांनी आपण ठीक व्हावे असे सांगून आपणास खोटी माहिती देऊन पैशाची पाऊस पाडतो, गुप्त धन देतो सांगून आपल्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली म्हणून रेखा भोईर यांनी गुन्हा दाखल केला आहे.