उल्हासनगर: जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सतनामसिंग लबाना असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गुरप्रितसिंग उर्फ अनिस करतारसिंग लुबाना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हे दोघेही उल्हासनगर कॅम्प ५ मधील वीर तानाजी नगर परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ कुलदीपसिंग विजेंद्रसिंग लुबाना (वय २८) याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्या कुटुंबात पूर्वीपासूनच वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या नातेवाईकांनी मयत सतनामसिंग याच्या विरोधात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात सतनामसिंगला अटकही झाली होती आणि सध्या तो या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. मात्र दोन्ही कुटुंबांमधील वाद आणि राग अधिकच उफाळून आला होता.
याच जुन्या भांडणाचा आणि एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा राग मनात धरून, सोमवार ६ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर ४ मधील कुर्ला कॅम्प रस्त्यावर काली माता मंदिराजवळ आरोपी गुरप्रितसिंग याने सतनामसिंगला गाठले. यावेळी रागाच्या भरात आरोपीने आपल्या हातातील चाकूने सतनामसिंगच्या मानेवर, छातीवर, पोटावर आणि शरीरावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने सतनामसिंगचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे करत आहेत.
