‘गल्ली बॉइज’साठी पालिकेचे व्यासपीठ

‘आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांच्या कलागुणांना वाव

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्टय़ांमधील मुलांना विविध संस्थांच्या माध्यमातून नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.

२०११च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १८ लाख इतकी होती. ती गेल्या आठ वर्षांत २३ लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी ५२ टक्के लोकसंख्या झोपडपट्टी भागातील आहे. झोपडपट्टी क्षेत्रात राहणाऱ्या १८ वर्षांखालील मुलांची संख्या १८ हजारांच्या आसपास आहे. यापैकी बहुतांश मुले महापालिका शाळेत शिक्षण घेतात. मात्र, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नसते. त्यामुळे कलागुण असतानाही ते मागे पडतात. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या समाज कल्याण विकास विभागाने अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून १८ वर्षांखालील मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. सहा ते आठ महिने इतका प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या संस्था झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन मुलांमधील अंगभूत कलागुण ओळखून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत. आवश्यकता वाटल्यास ते मुलांना समुपदेशन करणार आहेत. या मुलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

त्याचबरोबर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रण, मूल्यमापन, संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीनिहाय ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’ची निर्मिती केली जाणार आहे. ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून मुलांना नृत्य,

अभिनय आणि संगीत

शिकविले जाणार आहे. त्यासाठी महापालिका शाळेची जागा शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नृत्य, अभिनय आणि संगीत यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

झोपडपट्टय़ांमधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पातील हॅपिनेस इंडेक्स या उपक्रमाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार आहे. यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

– वर्षां दीक्षित, उपायुक्त, समाज विकास विभाग, ठाणे महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Under the art studio the sculptures of the slum children abn

ताज्या बातम्या