ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गजबजलेल्या रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतूक  कोंडी सोडवण्यासाठी अखेर महापालिकेने पावले उचलली आहेत. ठाणे स्थानकाजवळ असलेल्या गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या वाहनतळावर एकावेळी एकूण ३०० दुचाकी व चारचाकी उभ्या करता येणार आहेत. गावदेवी मैदानातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर भूमिगत वाहनतळ उभे करतानाच वरून सुसज्ज मैदानाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या निविदा मागवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसर हा दिवसरात्र गजबजलेला असतो. ठाणे स्थानकातून दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सहा लाख प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवाशांची या परिसरातून ये-जा सुरू असते. ठाण्याच्या पश्चिमेकडील भागात मोठय़ा प्रमाणावर नागरी वसाहतींची उभारणी होत असून येथील प्रवाशी लोकसंख्येचा भारही ठाणे स्थानकावर पडू लागला आहे. बहुसंख्य प्रवासी स्वत:ची वाहने घेऊन रेल्वे स्थानक गाठत असल्याने स्थानक परिसरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे प्रशासनाने वाहनतळ उभारले असले तरी ते पुरेसे नाही. पश्चिमेकडील बाजूस बेकायदा पद्धतीने वाहनतळ चालविले जात असल्याने तेथे वाहनांच्या सुरक्षेची फारशी हमी दिली जात नाही. ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील सुमारे अडीच हजार वाहन क्षमतेच्या वाहनतळाचा प्रकल्प आखला आहे.
मध्य रेल्वेच्या वाहनतळ प्रकल्पामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार असला तरी रेल्वे स्थानकाच्या भोवतालच्या परिसरात असेच एखादे सुसज्ज वाहनतळ उभारण्याशिवाय पर्याय नाही. स्थानक परिसरात खरेदी अथवा अन्य काही कामांसाठी येणारे रहिवासी आणि प्रवासी याच भागात रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या येथील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची कोंडी होत असते. हे लक्षात घेऊन स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारून तब्बल ३०० वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प महापालिकेने आखला आहे. या मैदानात दुमजली वाहनतळ उभारले जावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मध्यंतरी चर्चेस आला होता. मात्र, खेळाच्या मैदानात अशा प्रकारचे बांधकाम करण्यास विकास नियंत्रण नियमावलीत परवानगी नाही.
त्यामुळे या मैदानात भूमिगत वाहनतळ उभारून त्यावर अद्ययावत असे मैदान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मैदानाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७५०० चौरस मीटर इतके असून यापैकी ५५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर हे वाहनतळ उभारले जाणार आहे. या कामासाठी सुमारे २७ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कामाच्या निविदा येत्या काही दिवसांत काढल्या जातील, अशी माहिती अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.