ठाणे : कुख्यात गुंड रवी पुजारी याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची चर्चा पोलीस दलात होऊ लागली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करताना त्याने काळा टी-शर्ट आणि पाढंरी पँड, डोक्यावर काळी टोपी असा पेहराव केला होता.
शरिरयष्ठी लठ्ठ झालेला रवी पुजारी खंडणी मागण्यात पटईत असल्याने त्याची अंडरवर्ल्डमध्ये वेगळीच ओळख निर्माण झाली होती. परदेशात राहूनही तो त्याची गँग चालवित असे. मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांना, चित्रपटातील कलाकांना धमकाविणे अशी कामे करत असे. परदेशातून गुन्हेगारी करत असल्यान त्याची ‘रेड काॅर्नर’ नोटीस काढली होती. परंतु रवी पुजारी आहे तरी कोण पाहूया…
अंडरवर्ल्डमध्ये दाऊद, छोटा राजन, हाजी मस्तान यांच्याप्रमाणे एक नाव ९० च्या दशकात नेहमी चर्चेत असायचे ते म्हणजे रवी पुजारी. खंडणी वसूली करुन रवी पुजारी याने गैर मार्गाने मोठ्याप्रमाणात पैसा कमाविलेला होता. मूळचा कर्नाटक येथील उडपी भागातील रहिवासी असलेला रवी पुजारी आता ५७ वर्षांचा झाला आहे.
लहानपणीच तो गाव सोडून मुंबईत आला. परंतु त्याचा भूतकाळ भयंकर होता. पुजारी सुरुवातीच्या काळात एका टोळीमध्ये काम करत होता. त्या टोळीतील म्होरक्याचा एन्काऊंटर पोलिसांनी केल्यानंतर टोळीची सुत्रे रवी पुजारीकडे आली. रवी पुजारी याने १९९४ मध्ये प्रदीप झाल्टे याची हत्या केली. कारण, त्याच्या म्होरक्याची खबर झाल्टे याने पोलिसांना दिली होती असा संशय त्याला होता. हत्येप्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर रवी पुजारी हा कुख्यात गुंड छोटा राजन याच्या टोळीत काम करु लागला.
१९८८ मध्ये दाऊद इब्राहिम भारतातून पळून गेल्यानंतर मुंबईवर पकड बनविण्यासाठी आता स्पर्धा सुरु होती. याच दरम्यान, पोलिसांनी गुंडांचा खात्मा करण्याचा निर्णय घेतला होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांनी सर्वच गुंडांचा खात्मा करण्यास सुरुवात केल्याने १९९५ नंतर सुमारास रवी पुजारी परदेशात पळून गेला. पुजारी याची दहशत मात्र सिनेमासृष्टीत कायम होती. रवी पुजारीविरोधात खंडणीचे आणि धमकीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
सेनेगल मधून अटक
रवी पुजारी याला पश्चिम अफ्रिकेतील सेनेगल या देशातून २०१९ मध्ये अटक करण्यात आली. त्याचे प्रत्यर्पण भारतात करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी बंगळुरु येथील कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर त्याला आता विविध प्रकरणात पोलिसांकडून अटक केली जात आहे.
