महाराष्ट्रातील आमदारांचा आमदार निधी ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र आमचा खासदार निधी काही वाढताना दिसत नाही. मी अनेकदा मागणी केली पण अजून तरी तो वाढलेला नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तुटपुंज्या खासदार निधीबाबत टीका केली. बदलापुरात एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असताना आठवले यांनी हे वक्तव्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदलापूर पश्चिमेतील सोनिवली येथील स्मारकाच्या स्तूप आणि काही भागाचा लोकार्पण सोहळा सोमवारी बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कथोरे यांनी केली होती.

महाराष्ट्रातील आमदारांना ५ कोटी रुपये आमदार निधी

त्यावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या खासदार निधी बाबतच्या धोरणावर अप्रत्यक्ष टीका केली. महाराष्ट्रातील आमदारांना पाच कोटी रुपये आमदार निधीतून मिळतात. पण आमचा खासदार निधी वाढताना दिसत नाही. यासाठी मी सातत्याने मागणी केली. पण अजून तरी निधी वाढलेला नाही असे, असे सांगत आठवले यांनी केंद्र सरकारच्या खासदार निधी बाबतच्या धोरणावर टिपणी केली. निधी वाढलेला नसला तरी माझ्या खासदार निधीतून मी या स्मारकासाठी ४० लाख रुपये देत आहे, अशी घोषणाही यावेळी आठवले यांनी केली. तसेच या स्मारकासाठी लागणारा निधी मिळवून देण्यासाठी मी आणखी प्रयत्न करेल, असेही आश्वासन आठवले यांनी यावेळी बोलताना दिले.

अडीच वर्षात गडबड होऊ शकते
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले अडीच वर्षे पूर्ण करत आहे. त्यांचे आता अडीच वर्षे राहिले आहेत. अडीच वर्षे घालवणे अवघड नाही. पण मध्ये काहीतरी गडबड होऊ शकते, अस काही झालं तर आपण परत येऊ, अशी कोपरखळी रामदास आठवले यांनी मारली. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.