scorecardresearch

वसाहतीचे ठाणे : एकमेकां सा करू..

डोंबिवली पश्चिम विभागात गुप्ते रस्त्यावर ही चार मजली आणि तीन विंगची मोठी सोसायटी आहे.

Manisha Society Dombivali
मनीषा सोसायटी, डोंबिवली (प.)

मनीषा सोसायटी, डोंबिवली (प.)

सदनिका संस्कृतीतही प्रेम आणि जिव्हाळा जपून ठेवलेल्या सोसायटय़ांपैकी एक म्हणजे डोंबिवली पश्चिम विभागातील जय मनीषा सोसायटी. या संकुलातील कुटुंबीयांचे एकमेकांशी अत्यंत खेळीमेळीचे संबंध आहेत. गेली २५ वर्षे येथील एकोपा कायम असून त्याचे श्रेय महिला वर्गाला असल्याचे पुरुष सदस्य अभिमानाने सांगतात.

जय मनीषा इमारत उभी करण्यासाठी १९८३ मध्ये जागा घेण्यात आली. एका वर्षांत इमारत उभारण्यात आली. १९८४  मध्ये सदनिकाधारकांना घरांचा ताबा मिळाला.

डोंबिवली पश्चिम विभागात गुप्ते रस्त्यावर ही चार मजली आणि तीन विंगची मोठी सोसायटी आहे. या इमारतीत एकूण ६५ कुटुंबे राहतात. मारवाडी, ख्रिश्चन, सिंधी, तामीळ, केरळ अशा भिन्न समाजाचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. यावेळी सोसाटीतील सदस्य शंकरन यांना गणेश उत्सव साजरा करण्याची कल्पना सुचली. सर्वच जण नोकरदार होते. घरातील कर्ती मंडळी दिवसभर बाहेर असायची. त्यामुळे एकमेकांशी फारसा परिचय नव्हता. एकमेकांच्या गाठीभेटी व्हाव्यात, संवाद वाढावा म्हणून सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. त्याला इतरांनी पाठिंबा दिला. त्यासाठी जय मनीषा मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक, खेळ आणि चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये दोन वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांचे आजी-आजोबाही उत्साहाने सहभागी होतात. इमारतीतील कलावंत अतुल आघारकर हे गणपतीसाठी सुरेख आरास करतात. ती पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून इथे भाविक येतात. गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवाची जबाबदारी महिला सदस्यच पाहतात.

काळानुरूप सोसायटीतील काही कुटुंबे अन्यत्र स्थलांतरित झाली. त्यांची जागा नव्याने घेतली. मात्र तरीही दूरवर गेलेली कुटुंबे अजूनही संपर्क ठेवून आहेत. सणासुदीला ही मंडळी अजूनही आवर्जून येतात. २००५च्या जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. तेव्हा इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्यांच्या घरात पाणी शिरले. त्यांना स्वत:च्या घरात निवारा देण्याचे काम इमारतीतील इतरांनी केले. इमारतीतील एका सदस्याची मुलगी आजारी पडली होती. त्यावेळी त्यांना नुसताच दिलासा नव्हे तर पैशांसाठीही मदत केल्याचे सदस्यांनी सांगितले. वेळप्रसंगी रुग्णालयात दिवसरात्र थांबण्याचीही मदत येथील सदस्य करतात. पाऊस जास्त पडला की सोसायटीच्या तळमजल्यावरील घरांत पाणी शिरते. कारण सोसायटी परिसरातील गटारे व सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा अयोग्य आहे. त्याविषयी नगरसेवक व महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्याची फारशी दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. इमारतीच्या एका समितीला पाच वर्षे सोसायटीचा कारभार सांभाळण्याचा अधिकार मिळतो. इमारत जुनी असल्याने त्याचा पुनर्विकास करण्यासाठी सदस्य प्रयत्नशील आहेत. राजु मन्ना, गणपत सावंत, परशुराम चव्हाण सोसायटीचा कारभार सांभाळतात. सुधीर वेर्णेकर, भरत मोदी, संतोष मौर्ये, राजु बडेकर, अभय साबडे, संजय आग्रवाल, संकेत सावंत आदी तरुण उपक्रमात तसेच पर्यावरण जपण्यात हिरिरीने सहभागी होत असल्याचे महिला सदस्यांनी सांगितले. एकमेकांच्या सुखदु:खात, अडीअडचणींमध्ये मदत करण्यात सदस्य नेहमीच पुढाकार घेत असतात.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2017 at 01:20 IST
ताज्या बातम्या