scorecardresearch

कल्याणमध्ये महिलेवर लोखंडी सळईने हल्ला

बाजारपेठ पोलीस ठाण्यात नीला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

unknown person attacked woman in kalyan
महिलेवर लोखंडी सळईने हल्ला प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

कल्याण- कल्याण शहरात गेल्या काही दिवसांपासून लुटमार, मारहाण, हल्ल्याचा प्रयत्न या घटना वाढल्या आहेत. या सगळ्या प्रकाराने मुलांना शाळेत सोडणारे पालक अस्वस्थ आहेत. अशाप्रकारची गुन्हेगारी वाढू लागली तर घराबाहेर पडायचे की नाही, असे प्रश्न आता रहिवासी उपस्थित करू लागले आहेत. शुक्रवारी सकाळी कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तिने एका महिलेवर लोखंडी सळईने हल्ला करुन त्यांना जखमी केले.

दुसऱ्या एका घटनेत कल्याण पूर्व भागात तिसगाव भागात मेट्रो माॅल समोरील रस्त्यावर एका ओला कार चालकाला मारहाण करुन दोन जणांनी त्याच्या जवळील आठ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली.

हेही वाचा >>> ठाणे : अपघातात दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले, नीला पनीकर (३९) या कल्याण पश्चिमेतील अनुष्का पेट्रोल पंपाच्या मागे राहतात. शुक्रवारी सकाळी सात वाजता त्या साॅलिटेअर सभागृह येथून रस्त्याने पायी चालल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ति नीला यांच्या दिशेने आली. त्याने हातामधील लोखंडी वस्तूने नीला यांच्या पायावर जोरदार फटके मारुन त्यांना जखमी केले. नीला यांनी ओरडा करताच तो इसम पळून गेला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात नीला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

दुसऱ्या एका घटनेत डोंबिवलीत राहणारे ओला कार चालक इरफान शेख शुक्रवारी रात्री अडीच वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथून आपल्या भावाला घेऊन डोंबिवलीत घरी चालले होते. यावेळी रेल्वे स्थानका जवळ एक इसम दादागिरी करुन इरफान यांच्या कारमध्ये बसून दादागिरी करू लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन इरफान कार डोंबिवलीच्या दिशेने चालवू लागले. यावेळी मोटारीत जबरदस्तीने बसलेल्या इसमाने मोटारीचा ब्रेक ओढून गाडी बंद करण्याचा प्रयत्न केला. गाडीतील पक्कड इरफान यांच्या चेहऱ्यावर फेकली. इसमाने आपल्या आणखी एका मित्राला मेट्रो माॅल बाहेरील रस्त्यावर बोलावून तेथे तो इसम आल्यावर दोघांनी मिळून चालक इरफानला बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील प्रवासी शुल्काची व इतर आठ हजार रुपयांची रक्कम लुटून पलायन केले. कल्यााण पश्चिम रेल्वे स्थानक भागात रात्रीच्या वेळेत लुटमारीचे प्रकार वाढल्याने प्रवासी, पादचारी हैराण आहेत..

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 15:46 IST