डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे एकूण २० उमेदवार बिनविरोध निवडून आले. या बिनविरोध उमेदवारांच्या निवडीमुळे या उमेदवारांच्या प्रभागात गुरूवारी मतदान केंद्रे नव्हती. या बिनविरोध उमेदवारांची नावे ईव्हीएम मशिनवर स्थापित करण्यात न आल्याने या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील डोंबिवली, कल्याणमधील मतदार मात्र मतदानासाठी इच्छुक असुनही मतदानाची शाई लावण्यापासून वंचित राहिले.

डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली, मोठागाव, कोपर परिसरातील शिवसेना, भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. डोंबिवली पूर्वेत कचोरे, रामनगर, कल्याण पूर्वेत या प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीमुळे मतदानाची प्रक्रिया न झाल्याने या भागात मतदान केंद्रे नव्हती. काही मतदारांना बिनविरोध निवड, आपणास त्यामुळे मतदानाचा अधिकार नसेल. किंवा मतदान केंद्रातील मतदान यंत्रावर बिनविरोध उमेदवारांची नावे असतील याविषयी काही माहिती नव्हते.
गुरूवारी सकाळी बिनविरोध उमेदवार निवड झालेल्या प्रभागातील मतदार नेहमीप्रमाणे मतदानासाठी बाहेर पडले. ते आपल्या जवळच्या पालिका शाळा, राजकीय कार्यालयांमध्ये मतदान केंद्रे कुठे आहेत. आपली नावे कुठल्या मतदार यादीत आहेत हे शोधण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना आपल्या प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आपल्या प्रभागात मतदान प्रक्रिया होणार नाही असे सांगण्यात आले. हा सगळा प्रकार ऐकून मतदार आवाक झाले. उमेदवार बिनविरोध निवडून आला तरी तो आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी पाहिजे की नको यासाठी ईव्हीएम मशिनवर नोटा बटन आहे. त्या माध्यमातून आम्ही आमचे मत नोंदवले असते, अशा प्रतिक्रिया बिनविरोध उमेदवार निवडून आलेल्या प्रभागातील मतदारांनी दिल्या.
