कल्याण- कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. कामावर, शाळेत निघालेल्या नोकरदार, विद्यार्थी, पालकांची तारांबळ उडाली. बाजारपेठांमध्ये उघड्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांची सामान झाकून ठेवण्यासाठी पळापळ झाली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून काळे ढग आकाशात जमा आले होते. सकाळी १० वाजता पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यानंतर १५ ते २० मिनिटे पाऊस सुरू होता. पाऊस थांबेल या आशेवर घरात थांबलेल्या नागरिकांना छत्री घेऊन घराबाहेर पडावे लागले. सकाळी दहाची वेळ मुलांची शाळेत जाण्याची असते. त्यामुळे पालकांना मुलांना रेनकोट, छत्री घेऊन शाळेचा रस्ता धरावा लागला. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी वाढल्याने लख्ख सूर्यप्रकाश काही वेळ लुप्त झाला. जवळ छत्री नसल्याने अनेक प्रवासी रेल्वे स्थानक, बस आगारात अडकून पडले होते. अवकाळी पावसाने रब्बी पिके घेणारे शेतकरी, आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वसंत ऋतुमुळे बहरलेली झाडे, फुले मात्र पावसाच्या शिडकाव्याने ताजीतवानी झाली होती.