बदलापूर : दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेच्या सायंकाळी सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड, शहापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी उशिरा कापणी करून भात शेतातच ठेवला होता. अशा शेतकऱ्यांचा कापलेला भात पाण्यात गेला आहे. त्यासोबतच तीळ, खुरसणी, उडीद, वरई आणि नाचणीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. अस्मानी संकटामुळे यंदाच्या वर्षांत नुकसान होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदाच्या वर्षांत निसर्गाच्या संकटात कशीबशी टिकलेली पिके ऐन दिवाळीच्या दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भिजून वाया गेली आहेत. दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेच्या दिवशी शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस सायंकाळच्या सुमारास पाऊस कोसळला. हवामान खात्याने या अवकाळी पावसाची पूर्वसूचना दिली होती. त्यानंतरही उशिराने कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे भाताचे पीक या अवकाळी पावसात सापडले. शुक्रवारी मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यांत पडलेल्या या पावसामुळे शेवटच्या टप्प्यात कापणी झालेले भाताचे पीक भिजले. अंबरनाथ तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी मुरबाड आणि शहापूर तालुक्यांत या नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी भात पिकाची कापणी करून काही दिवस सुकण्यासाठी शेतातच ठेवतात. त्याच वेळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण भाताचे पीक पाण्यात भिजले. त्यामुळे हातचे पीक वाया गेले आहे. प्रशासनाने वेळीच पंचनामे करून आम्हाला दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी मुरबाड तालुक्यातील बांधिवली येथील शेतकरी योगेश भोईर यांनी केली.