डोंबिवली – हुडहुडी थंडी असतानाच मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही वेळ पावसाची ही रिमझिम सुरू होती. थंडीचे वातावरण असताना अचानक सुरू झालेल्या या पावसाने सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदार, बाजारपेठांमधील विक्रेत्यांची काही वेळ पळापळ झाली.
मागील तीन दिवसांपासून हवेत गारवा आहे. हुडहुडी भरवणारी थंडी रात्री ते पहाटेपर्यंत असते. अशा परिस्थितीत पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे नसताना मंगळवारी अचानक सकाळच्या झुंजुमंजुच्या वेळेत आकाशात काळे ढग जमा झाले. आणि बघता बघता पावसाची रिमझिम सुरू झाली. सकाळच्या वेळेत आपल्या पालकांबरोबर शाळेच्या दिशेने निघालेली मुले पाऊस सुरू होताच पावसापासून बचावासाठी आडोसा शोधू लागली. तर काही मुलांनी डोक्यावर दप्तर घेऊन पालकांसोबत शाळेचा रस्ता धरला.
डोंबिवली बाजारपेठेत सकाळच्या वेळेत फळ विक्री, भाजीपाला दुकाने लावण्याच्या तयारीत असलेल्या दुकानदारांची अवकाळी पावसाने गडबड उडवली. सकाळच्या वेळेत चहाच्या ठेल्यांवर चहा पिण्यासाठी गर्दी असते. हे नागरिकही अवकाळी पावसाने आश्चर्यचकित झाले. शाळेच्या बस, लहान मोटारीतून शाळेच्या दिशेने निघालेली मुले खिडकीतून हात बाहेर काढून पावसाचे पाणी हातावर घेण्याचा प्रयत्न करत होती. कोठेही पावसाची चिन्हे नसताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गेल्या वर्षी पावसाचे चार महिने असताना जून ऐवजी १० मे पासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे मागील वर्षी पाच महिने पाऊस पडला. ऑक्टोबर- नोव्हेंबर अखेरपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने प्रवास सुरू केला असे हवामान विभागाने जाहीर केले होते. तरीही त्यानंतर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच राहिल्या. यामुळे भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.
या पावसामुळे हरभरा, उडीद, वाल अशी कडधान्यादी रब्बी पिके घेणारा शेतकरी मात्र सुखावला. शेतामध्ये गारवा राहिल्याने ही पिके आता तरारून वर आली आहेत. हरभरा, वाल पिकाला पावसाच्या शिडकाव्याची गरज असते. त्यामुळे या अवकाळी पावसाने या कडधान्यादी पिकांना फुलांचा बहर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कल्याण डोंबिवलीत अनेक विकास कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी राबणारा कष्टकरी मजूर या कामांच्या परिसरात राहुट्या उभारून कुटुंब कबिल्यासह राहतो. आज सकाळी अवकाळी पाऊस सुरू होताच त्यांचीही तारांबळ उडाली.
