उल्हासनगर : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा अंतर्गत येणाऱ्या जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशाचे सोन्याचे दागिने व किमती ऐवज चोरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा छडा लावत उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. या हायप्रोफाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी उल्हासनगरातून चार आरोपींना अटक केली असून, धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी शिवसेना शिंदे गटाशीसंबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरचे रहिवासी असलेले तक्रारदार राजविंदर सिंह अजीत सिंह यांनी ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये राजविंदर सिंह यांनी त्यांचे वर्षानुवर्षे विश्वासात काम करणारे दोन कर्मचारी विक्की काटेजा आणि संतोष चौहान यांना लखनऊ येथील एका मित्राकडून काही मौल्यवान वस्तू आणण्यासाठी पाठवले होते.

१० मार्च २०२५ रोजी विक्की आणि संतोष लखनऊच्या आलमबाग येथून दिल्लीसाठी शयनयान बसने निघाले. प्रवासादरम्यान आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून फिर्यादीचे लक्ष विचलित केले. बस जेवर टोल नाक्याजवळ पोहोचली असता, एका बुरखाधारी अज्ञात महिलेच्या मदतीने सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेला काळा रंगाची बॅग चोरून गाडीतून पळ काढला. सुरुवातीला हा निव्वळ चोरीचा प्रकार भासवला जात होता. मात्र सखोल चौकशीअंती विक्की, संतोष आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून हा बनाव रचल्याचे व मालकाचाच कोट्यवधींचा ऐवज हडप केल्याचे स्पष्ट झाले.

उत्तर प्रदेशच्या जेवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या गुन्ह्याचे धागेदोरे उल्हासनगर शहराशी जोडले गेले. यूपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने उल्हासनगरमध्ये छापेमारी करत या कटात आणि चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यात सामील असलेल्या चार आरोपींना अटक केली आहे. कमल पंजाबी, भाविषा राजानी, संतोष चौहान (गुन्ह्यात थेट सामील असलेली महिला कर्मचारी) आणि धीरज लालचंदानी अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीसांनी दिली आहे. तर अशा प्रकारची अटक झाली असून उत्तर प्रदेश पोलिसांना अटकेच्या कारवाईत सहकार्य केल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या या चार आरोपींपैकी एका आरोपीचे थेट संबंध महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षाशी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एका मोठ्या गुन्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे किंवा कार्यकर्त्याचे नाव समोर आल्याने उल्हासनगरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश पोलीस या सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन उत्तर प्रदेशात रवाना झाले असून, चोरीला गेलेला मौल्यवान सोन्याचा ऐवज हस्तगत करण्याचे आणि या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा सखोल तपास जेवर पोलीस करत आहेत.