उन्हाळ्याच्या सुट्टीत टी.व्ही. पाहण्याव्यतिरिक्त काय करावे, असा प्रश्न मुलांना पडलेला असतो. अशी कार्टून्स पाहून कंटाळलेल्या मुलांसाठी या आठवडय़ात विशेष चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. डोंबिवलीत अमृता लिमये आणि कल्याणमध्ये अश्विनी कुलकर्णी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत मुलांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखांची चित्रे, कॅलिग्राफी, वारली पेंटिंग, हास्यचित्रे, सेल्फी चित्रे त्याचबरोबर फुग्यांच्या आधारे चित्र काढणे असे अनेक प्रकार शिकता येणार आहेत. कल्याणमधील कार्यशाळा ओक हायस्कूल, दत्तआळीजवळ, टिळक चौक, कल्याण प. येथे आहे, तर डोंबिवली येथील कार्यशाळा अस्पा क्लासेस, सावरकर रोड, डोंबिवली (पू.) येथे घेण्यात येणार आहे. संपर्क कल्याण : ८०९७८८८६९४ आणि डोंबिवली : ९८९२७७७६८
कधी- १२ ते २० मे
कुठे- कल्याण, डोंबिवली

श्वानांसाठी आरोग्य शिबीर
घरातील पाळीव श्वानांच्या आरोग्य तपासणीसाठी वेटरनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने येत्या रविवारी ८ मे रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ६ या वेळेत शेल्टर फार्म, कासारवडवली, ठाणे (प.) येथे विमामूल्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रेबीज रोगापासून कसा बचाव करावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क-९८२१०४०३३७.
कधी- रविवार, ८ मे, दुपारी २ ते सायंकाळी ६
कुठे -शेल्टर फार्म, कासारवडवली, ठाणे(प.)

दह्य़ाचे दशावतार
उन्हाळा सुरू झाला की थंड पदार्थ खाण्यासाठी अनेकांची पावले आपोआप आइस्क्रीम पार्लरकडे वळतात. मात्र हे थंड पदार्थ निरोगी आहेत की नाहीत याची आपल्याला खात्री देता येत नसते. दुधाकडे बघून नाके मुरडणारी मुले आईने आईने करून दिलेले दह्य़ांचे विविध प्रकार मात्र आवडीने खातात. तेच ते खाऊन मुले कंटाळतात. त्यामुळे दर वेळी काही तरी नवे करून देण्याचा प्रयत्न महिला करीत असतात. ठाण्यातील कोरम मॉलमधील ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ उपक्रमात असेच नावीन्यपूर्ण पदार्थाचे प्रशिक्षण दिले जाते. येत्या बुधवारी ११ मे रोजी ‘फ्लेवर्ड योगर्ड’ (वेगवेगळ्या चवीचे दही) बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चॉकलेट्सपासून बनवलेले ‘चॉकलेट चिप ब्राऊनी योगर्ड’, मधुर आंब्यापासून तयार केलेले ‘मॅन्गो योगर्ड’, कलिंगडापासून बनवलेले ‘मेलॉन योगर्ड’, ‘ब्ल्यूबेरी योगर्ड’ आदी थंडगार आणि चमचमीत योगर्डस्चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कधी – बुधवार, ११ मे, वेळ दुपारी ३ ते रात्री ८
कुठे- कोरम मॉल मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, द्रुतगती महामार्ग, ठाणे (प)

आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची पर्वणी
डोंबिवलीमधील प्रतिमा फिल्म सोसायटी व डोंबिवली जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने या वीकेन्डला दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅन्ट स्टोरी (बांगला देश), मदर ऑफ अस्फाल्ट (क्रोएशिया), हश्! गर्ल्स डोन्ट स्क्रीम (इराण), अ‍ॅव्हलॉन (स्वीडन), रेड कॉटन स्लिक फ्लॉवर (म्यानमार), सेक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड टॅक्सेशन (डेन्मार्क ), द बेट क्लेक्टर (फिलिपाइन्स), वी कम फ्रॉम अवे (अर्जेटिना) हे आठ चित्रपट या महोत्सवामध्ये दाखविले जाणार आहेत. ७ व ८ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली जिमखाना येथे हा महोत्सव होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी हा महोत्सव खुला आहे.
कधी- ७ व ८ मे, सायंकाळी ५ ते रात्री ९
कुठे- डोंबिवली जिमखाना डोंबिवली (पू.)

शास्त्रीय वाद्यसंगीताची त्रिमिती
शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्थापन झालेल्या कल्याणमधील होरायझन या संस्थेतर्फे शनिवार, ७ मे रोजी आचार्य अत्रे नाटय़गृहात रात्री साडेआठ वाजता ‘त्रिमिती’ ही विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. सतार, सारंगी आणि तबला या वाद्यांच्या जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना या मैफलीत घेता येणार आहे.
पूर्वायन चॅटर्जी (सतार), साबीर खान (सारंगी) आणि सत्यजीत तळवलकर (तबला) हे कलावंत सुरांच्या या प्रवासात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध नर्तक विशाल कृष्ण हे कथक नृत्याविष्कार सादर करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२०५७८२९८
कधी- शनिवार, ७ मे वेळ : रात्री ८.४५
कुठे- आचार्य अत्रे रंग मंदिर, कल्याण(प.)

पं. अरुण कशाळकर यांचे गायन
व्हर्टिकल नोटस् ही संस्था गेल्या काही महिन्यांपासून ‘रागरंग’ या मालिकेद्वारे शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार मैफली आयोजित करीत आहे. या उपक्रमात येत्या रविवार, ८ मे रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत सहयोग मंदिर, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प) येथे सुप्रसिद्ध गायक पं. अरुण कशाळकर यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. त्यांना प्रवीण करकरे (तबला) व अंनत जोशी (हार्मोनिअम) साथ देणार आहेत. तसेच हिंदी व मराठी चित्रपट संगीतातील आघाडीचे सनईवादक ओंकार धुमाळही या वेळी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९००४४६२२५२
कधी- रविवार, ८ मे वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०
कुठे- सहयोग मंदिर, घंटाळी पथ, नौपाडा ठाणे (प.)

हापूससोबत कोकणी पदार्थाचीही रेलचेल
ऋतुकालानुसार फळे खाणे आरोग्यास हितकारक असते. मे महिना हा हापूस आंब्यांचा मानला जातो. त्यामुळे बाजारात सर्वत्र या फळांच्या राजाचे साम्राज्य आहे. नैसर्गिकरीत्या पिकवलेला अस्सल हापूस आंबा आंबाप्रेमींना तृप्त करण्यासाठी सर्वत्र उपलब्ध आहे. डोंबिवलीत ‘कोकण एकता प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ८ ते १५ मेदरम्यान भागशाळा मैदान, डोंबिवली(प.) येथे होणाऱ्या या आंबा महोत्सवात थेट शेतक ऱ्यांकडून आंबा खरेदी करण्याची संधी डोंबिवलीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये हापूस, पायरी आणि रत्ना या आंब्यांच्या स्टॉलबरोबरच कोकणातील विविध खाद्य पदार्थही उपलब्ध आहेत.
कधी- रविवार, ८ मे ते १५ मे,
कुठे- भागशाळा मैदान, डोंबिवली पूर्व

दान करी रे..
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घावे’ या ओळी सर्वानी आपल्या मनात रुजवाव्यात या उद्देशाने ठाणे शहराचा सांस्कृतिक न्यास म्हणून प्रसिद्ध असलेल्या आचार्य अत्रे कट्टय़ातर्फे दान या संकल्पनेवर आधारित ‘दान करी रे..’ हा सुमधुर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले, सुप्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, मंदार आपटे व प्रीती निमकर सहभागी होणार आहेत. रविवार, ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सरस्वती विद्यामंदिर, नौपाडा, ठाणे(प.) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
कधी- रविवार, ८ मे, सकाळी १० ते दुपारी १
कुठे- सरस्वती विद्यामंदिर, नौपाडा, ठाणे(प.)

‘कारगिल’ युद्धाची सचित्र कहाणी
युद्धाचे वर्णन किंवा युद्धविषयक गोष्टी आपण सहजतेने घेतो, त्याकडे पाहतो आणि सुरक्षित वातावरणात त्या ऐकतो. पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपल्या जिवाची बाजी लावून सैनिक लढत असतात. शत्रूला मारताना किंवा शत्रूचे तळ उद्ध्वस्त करताना अनेकदा आपल्या सैनिकांना प्राणांची आहुती द्यावी लागते, ते कोणत्या परिस्थितीत काम करतात, त्यांना कोणत्या आव्हानांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते याची तसेच एखाद्या युद्धाच्या वेळी नेमके काय घडते त्याची सर्वसामान्यांना माहिती नसते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. पाकिस्तानी सैन्य आणि काश्मिरी दहशतवादी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसले होते. १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने शर्थीने
प्रयत्न करून घुसखोरांच्या ताब्यातून आपला
भूभाग मोकळा केला आणि कारगिलचे युद्ध जिंकले. कारगिल युद्धाची सचित्र कहाणी अनुराधा प्रभुदेसाई मुलुंड येथे उलगडणार आहेत. लक्ष्य फाऊंडेशनने ‘सॅल्यूट इंडिया’ या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कधी- शनिवार ७ मे
कुठे- महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
(पश्चिम)
केव्हा- सायंकाळी ५.३०

सांगावंसं वाटलं म्हणून!
स्मार्ट भ्रमणध्वनी, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि माहितीच्या महाजालाच्या आक्रमणामुळे तरुण पिढीचे विशेषत: मराठी पुस्तकांचे वाचन कमी झाले आहे. आत्ताची पिढी ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी असल्याने त्याचाही परिणाम वाचनावर झाला आहे. खरे तर वाचन हा एक संस्कार आहे. आपल्या भावनिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठीही चांगल्या पुस्तकांचे वाचन गरजेचे आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने गेले काही महिने ‘चला वाचू या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वाचन चळवळ वृद्धिंगत करणे, अभिवाचनाद्वारे उत्तमोत्तम साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे आणि वाचिक अभिनयासारख्या कलेकडेही जाणीवपूर्वक लक्ष वेधणे हा उद्देश या मागे आहे. बदलत्या काळात तरुण पिढीचे तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वैयक्तिक अवांतर (शैक्षणिक पुस्तके सोडून) वाचन कमी झाले आहे. वाचनाची आवड जोपासली जावी आणि त्यातून वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी संस्थात्मक पातळीवर वेगवेगळे प्रयत्न होत असतात. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि ‘चैत्र’ निर्मित ‘सांगावंसं वाटलं म्हणून’ हा साहित्य अभिवाचनाचा असाच एक उपक्रम. संस्थेतर्फे होणाऱ्या साहित्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रकाश भाटवडेकर, प्रज्ञा भाटवडेकर, चंद्रकांत मेहेंदळे, लतिका सावंत, मिलिंद फाटक हे सहभागी होणार आहेत.
कधी- रविवार ८ मे
कुठे- पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी,
केव्हा- सायंकाळी ५ वाजता

नृत्यातून गीतरामायण उलगडणार!
ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले, गायलेले ‘गीतरामायण’ हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. साठ वर्षांनंतरही ‘गीतरामायण’च्या गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. प्रत्येक गाणे रसिकांच्या ओठावर आहे. ‘गीतरामायण’ १९५५-५६ या कालावधीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झाले. त्या काळात ‘गीतरामायण’ला अमाप लोकप्रियता मिळाली. ‘गदिमां’च्या ‘गीतरामायण’चा हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, कोकणी, संस्कृत, तेलुगू, सिंधी या भाषेतही अनुवाद झाले. प्रसिद्ध भावगीत गायक वसंत आजगावकर यांनीही ‘गीतरामायण’ हिंदीत सादर केले. नृत्यांगना सोनिया परचुरे व त्यांचे सहकारी ‘गीतरामायण’ नृत्यशैलीत सादर करतात. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत झालेल्या रंगसंमेलनात त्याचे सादरीकरण झाले होते. ‘गदिमा’ यांनी रचलेल्या ‘गीतरामायण’चा नृत्य आविष्कार पाहण्याची संधी मुंबईकर रसिकांना उपलब्ध झाली आहे. नृत्यदर्पण अकादमीतर्फे ‘नृत्य गीतरामायण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन संध्या दामले यांचे आहे.
कधी – शुक्रवार ६ मे
कुठे – स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
केव्हा- रात्री ७-३० वाजता.

‘मंथन’च्या विद्यार्थ्यांचे कला प्रदर्शन
मंथन आर्ट फाऊंडेशनतर्फे तीन दिवसांच्या सामाजिक जाहिरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवार, ७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून हा कार्यक्रम पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे होणार आहे. जाहिराततज्ज्ञ उदय पारकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांच्या महोत्सवात राजेश कुलकर्णी, कमल स्वरूप, प्रा. शशिकांत गवळी हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याच कालावधीत मंथन आर्ट फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
कधी- ७ ते ९ मे
कुठे- पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रांगण, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
केव्हा- सकाळी १० ते सायंकाळी ७

शास्त्रीय संगीताची जुगलबंदी
भारतीय शास्त्रीय संगीताला खूप मोठी परंपरा असून भरत मुनी यांचे ‘नाटय़शास्त्र’ आणि त्या आधीही ‘सामवेद’ ग्रंथातून याची माहिती मिळते. भरत मुनी यांच्यानंतर मातंग ऋषी यांच्या ‘बृहद्देशी’ तसेच शारंगदेव यांनी लिहिलेल्या ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात संगीत आणि ताल यांची माहिती आहे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात हे ग्रंथ लिहिले गेले. अनेक दिग्गज गायकांनी भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटामुळे तरुण पिढीमध्ये शास्त्रीय संगीत आणि नाटय़ संगीताबद्दल आवड निर्माण झाली आहे. संगीतप्रेमी रसिकांसाठी कर्नाटक संघाच्या कलाभारती शाखेनेरविवारी असाच सुरेल योग जुळवून आणला आहे. पूजा बाक्रे आणि स्वरांगी मराठे यांची शास्त्रीय संगीत जुगलबंदी तसेच विजय जोशी व आनंदी जोशी यांनी ‘तराना’ गायकीतील सादर केलेली विविधता ऐकायला मिळणार आहे. गायकांना विनायक गवस (तबला) व सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम) यांची संगीतसाथ लाभणार आहे.
कधी- रविवार ८ मे
कुठे- कर्नाटक संघ सभागृह, माहीम, मुंबई
केव्हा- सकाळी १० वाजता