डोंबिवली – वेळोवेळी विविध प्रकारची नावे धारण करायची. आपण इस्रोत वैज्ञानिक असल्याची माहिती तरूणींना देऊन त्यांना लग्न बंधनाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि नंतर लग्न न करता त्यांची फसवणूक करून पैसे घेऊन पसार व्हावयाचे. अशाप्रकारची फसवी कार्यपध्दती वापरून विवाहोच्छुक तरूणींना फसविणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रसायनी येथील एका तरूणाविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरूणीने तक्रार दाखल केली आहे.

ही तरूणी डोंबिवली जवळील पलावा गृहसंकुलात राहते. ती मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती घटस्फोटीत आहे. या पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रूद्रेश गणेश गोंधळी (३५) या तरूणा विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रूद्रेशने यापूर्वी आदर्श प्रशांत म्हात्रे, नहूश म्हात्रे, स्वप्निल वारूळे, तन्मय म्हात्रे, जयेश नाईक अशी नावे धारण केल्याचे पीडित तरूणीने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. रूद्रेश गोंधळी हा मूळचा उरण तालुक्यातील रसायनी गावचा रहिवासी आहे. तो सध्या मुंबई सेंट्रल येथील दलाल इस्टेटमधील नाथानी हाईट्स संकुलात वास्तव्याला आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

प्रकरण काय आहे

पीडित महिला ही घटस्फोटीत आहे. ती पलावा कासाबेला गोल्ड गृहसंकुलात एकटी राहते. ती अंधेरी येथे खासगी कंपनीत नोकरी करते. या महिलेला दुसरा विवाह करायचा होता. तिने शादी डाॅट काॅम संकेतस्थळावर वर मिळण्यासाठी नाव नोंदणी केली होती. गेल्या महिन्यात रूद्रेश गोंधळी याने पीडितेला संपर्क केला. आपण इस्त्रोत वैज्ञानिक असल्याचे रूद्रेश यांनी पीडितेला कळविले. रूद्रेश पीडितेच्या घरी येऊ लागला. लग्न करण्यास इच्छुक असल्याचे आणि लवकरच कुटुंबीयांशी बोलून लग्न तारीख निश्चित करण्याचे बोलू लागला. दरम्यान, रूद्रेशने आपण रसायनी भागात जमीन खरेदी करणार आहोत. त्यासाठी पैसे कमी पडत आहेत असे सांगून पीडितेकडे २५ लाखाची मागणी केली. ते पैसे तात्काळ परत करण्याचे सूचित केले.

पैसे उकळले

रूद्रेशने पीडितेच्या मोबाईलवरून तिचा व्यवहारांचा गुप्त संकेतांक पाहून आयसीआयसीआय बँकेकडून २४ लाख ९० हजाराचे कर्ज मंजूर करून घेतले. रूद्रेशने पीडितेला गोवा कसिनो येथे आपल्या कामानिमित्त नेले. तेथे त्याने पीडितेच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करून सात लाख ५० हजार रूपये रकमेचा वापर केला. कर्ज रक्कम जमीन विक्री करणाऱ्या द्यायचे आहे सांगून रूद्रेशने मीनल गुंडरे, विठ्ठल एन्टरप्रायझेस, सिध्दांत गायकवाड, सुचिता डेरे, डिम्पल या नावाने वर्ग केले.

पितळ उघडे पडले

गोव्यात असताना एका इसमाने रूद्रेशला आदर्श म्हात्रे नावाने हाक मारले. त्यावेळी तक्रारदार महिलेला संशय आला. तिने घरी आल्यावर शादी डाॅट काॅमवर रुद्रेश गोंधळी नावाने शोधतपास केला. तिला रूद्रेश नावाने कोणी आढळले नाही. आदर्श म्हात्रे नाव तपासले. त्यावेळी आदर्शने अनेक मुलींना लग्नाचे आमीष दाखवून फसविले असल्याचे तरूणीला दिसून आले. त्यामुळे विविध नावे बदलून आपण मोठ्या पदावर कार्यरत आहोत असे विवाहोच्छुक तरूणींना सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि अशाच पध्दतीने आपली २४ लाखाची फसवणूक करणाऱ्या रुद्रेश गोंधळी विरूध्द आपण तक्रार करत आहोत, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.