डोंबिवली – एका खासगी कंपनीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका रिक्षा चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे रिक्षा चालवून एका पादचारी महिलेला रिक्षेची जोराची धडक देऊन तिला गंभीर जखमी केले. या अपघातात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षेत बसलेली वृध्द महिला जखमी झाली. रिक्षा चालकाच्या बेशिस्तपणातून हा अपघात घडल्याने एका महिलेने याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुरेश अशोक वाघमारे (३३) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते ठाण्यातील कोलशेत रस्त्यावरील आझादनगर भागात राहतात. रूपाली राजीवडेकर यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रिक्षा चालक वाघमारे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रूपाली या बोरीवली येथे राहतात. त्या डोंबिवलीतील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अधूनमधून येत असतात.

पोलीस ठाण्यातील तक्रारीत रूपाली राजीवडेकर यांनी म्हटले आहे, की मी माझ्या डोंबिवलीतील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या महिन्यात आले होते. भेटीनंतर संध्याकाळी मी प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या एका खासगी कंपनीच्या रिक्षेची ऑनलाईन नोंदणी केली. सुरेश वाघमारे हे या रिक्षेचे रिक्षा चालक होते.ते ठाणे येथे राहतात. संध्याकाळी सहा वाजता मी, माझी आई लक्ष्मी अशा दोघींनी रिक्षेतून बोरिवलीच्या दिशेने प्रवास सुरू केला. रिक्षा डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी भागातून निघाली होती.

कोपर उड्डाण पुलावरून ९० फुटी रस्त्याने आम्ही माणकोली पुलाकडे जात होतो. रिक्षा चालक भरधाव वेगाने रिक्षा चालवत होता. त्याला मी रिक्षा हळू चालव असे सांगत होते. पण तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. सुरेश वाघमारे यांची रिक्षा सुसाट वेगाने धावत असताना कोपर रस्ता भागात शेळी गोट फार्म समोरील भागातून भरधाव वेगात असलेल्या रिक्षेने ठाकुरवाडीतील एक पादचारी महिला स्वाती राणा यांना जोराची धडक दिली. त्या धडकेत त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या सर्वांगाला गंभीर दुखापत झाली.

राणा यांना जोराची धडक देऊन रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती. त्यामुळे रिक्षेत बसलेली आपली वृध्द आई रिक्षे बाहेर फेकली गेली. तिच्या हाता, पायांना गंभीर दुखापती झाल्या.

राणा या महिलेला इतर पादचारी, वाहन चालकांनी मदत केली. त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आपण आपल्या आईला डोंबिवलीत एका रुग्णालयात तात्पुरते उपचार करून रात्री बोरिवली येथील रुग्णालयात हलविले. आईला गंभीर दुखापती झाल्या होत्या. आपल्यामुळे या दोन्ही महिलांना गंभीर दुखापती झाल्या आहेत याची जाणीव असुनही दोन्ही जखमी महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत न करता सुरेश वाघमारे हा रिक्षा चालक घटनास्थळावरून पोलिसांना या अपघाताची माहिती न देता पळून गेला म्हणून तक्रारदार महिलेने रिक्षा चालक वाघमारे विरूध्द तक्रार केली आहे.

विष्णुनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. अशाप्रकारची खासगी प्रवासी सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या विरूध्द गेल्या वर्षी कल्याण आरटीओने एकूण ५० हून अधिक गुन्हे दाखल केले होते. या कंपनीने परिवहन विभागातून आवश्यक परवानग्या घ्याव्यात मगच प्रवासी सेवा द्यावी, असे परिवहन विभागाचे म्हणणे होते. तरीही अनेक वाहन चालक या खासगी कंपनीचे नाव वापरून प्रवासी देत असल्याचे दिसून येत आहे.