ठाणे : भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेला तात्पुरता प्रकल्पातील यंत्रामध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकून हा प्रकल्प बंद पडला असून असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने आता कचरा चाळूणच तो यंत्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या ठिकाणी लोखंडी जाळीच्या साहय्याने चाळणी तयार केल्या आहेत. या शिवाय, मुंब्य्रातील एमएम व्हॅली आणि दिव्यातील डावले गावात कचरा चाळण बसविण्यात येणार असून अशाप्रकारे तिन्ही ठिकाणी एकूण १९ चाळणी बसविण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. हा प्रकल्प सुरु होईपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. दिड महिन्यांपुर्वीच सुरु झालेला हा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून बंद पडला आहे. या प्रकल्पातील यंत्रणेमध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकला असून यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचे पाणीही प्रकल्पात शिरले असून त्याचाही फटका या प्रकल्पाला बसला आहे. यामुळे ठाण्याचा कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर टाकला जात आहे.

हेही वाचा : वाहतूक कोंडीमुळे कल्याणवासियांचा श्वास कोंडला ; तीन मिनिटांच्या प्रवासासाठी लागतोय तब्बल सव्वा तास

भंडार्ली येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पातील यंत्रात अडकलेला साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा काढण्यात आला असून त्यानंतर यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली आहे. असे असले तरी या यंत्रणामध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकून पुन्हा ते बंद पडण्याची शक्यता असून ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कचरा चाळून तो यंत्रणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या ठिकाणी लोखंडी जाळीच्या साहय्याने चाळणी तयार केल्या आहेत. तसेच मुंब्य्रातील कचरा आता एमएम व्हॅली येथील पालिकेच्या आरक्षित भुखंडावर तर दिव्यातील कचरा डावले येथील शासकीय भुखंडावर टाकला जाणार असून त्यानंतर त्याचे वर्गीकरण करून तो पुढे भंडार्ली येथील प्रकल्पात पाठविला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी कचरा चाळण बसविण्यात येणार असून अशाप्रकारे तिन्ही ठिकाणी एकूण १९ चाळणी बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : उल्हास नदीच्या पूररेषेचे फेर सर्वेक्षण होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

प्रकल्पासाठी मनुष्यबळ

भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेला तात्पुरता प्रकल्प दिड महिन्यांपुर्वी सुरु करण्यात आला. या प्रकल्पाचे कामकाज ठाणे महापालिकेच्या कामगारांमार्फत तात्पुरत्या स्वरुपात केले जात होते. परंतु याठिकाणी आता मनुष्यबळ घेण्याची प्रक्रीया पालिका प्रशासनाने पुर्ण केली असून त्यासंबंधीची निविदा लवकरच अंतिम करुन मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. एकूण १०० कर्मचारी ठेकेदारामार्फत घेतले जाणार असून ते दोन सत्रात कचरा विल्हेवाटीचे काम करणार आहेत. हे कामगार येताच प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of strainer by thane municipal corporation to prevent breakdown of waste disposal plant tmb 01
First published on: 29-09-2022 at 14:16 IST