कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर शनिवारी सकाळी पाच वाजता उत्तरप्रदेशातील एका प्रवाशाला स्कायवाॅकवर झोपलेल्या दोन फिरस्त्यांनी चाकुचा धाक दाखवून लुटले. या प्रवाशाच्या खिशातील साडे तीन हजार रूपयांची रोख रक्कम जबरदस्तीने दोन्ही फिरस्तांनी काढून घेतली. ते गर्दुल्ले असावेत असा पोलिसांना संशय आहे.
महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातील स्कायवाॅकवर, रेल्वे स्थानक भागात रेल्वे प्रवासी, पादचारी यांना लुटण्याच्या घटना गेल्या दोन ते तीन वर्षात वाढल्या होत्या. रात्री कामावरून परतणाऱ्या महिला, पुरूष प्रवाशांना हे लुटारू लुटत होते.
रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मद्यपी, गर्दुल्ले यांचे अड्डे होते. दिवसभर शहराच्या विविध भागात फिरायचे आणि रात्री आश्रयासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट, स्कायवाॅकवर यायचे. असा या गर्दुल्लांचा नित्यक्रम होता.
कल्याण रेल्वे स्थानक भागात गु्न्हेगारांचा वाढता वावर आणि रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या जीविताला गर्दुल्ले धोका निर्माण करत होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण रेल्वे स्थानक भागात विशेष गस्ती पथके तैनात करून या भागातील दिवसा रात्रीची गुन्हेगारी मागील दहा महिन्याच्या काळात मोडून काढली.
रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी रेल्वे स्थानकात सतत गस्त घालून रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर गर्दुल्ले, मद्यपी ठाण मांडणार नाहीत अशी व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक भागातील गुन्हेगारीवर थोडा अंकुश आला आहे. उत्तरप्रदेशात राहणारे मोहम्मद अन्सारी (२७) काही कामानिमित्त कल्याण येथे आले आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात ते शनिवारी पहाटे पाच वाजता परतीच्या प्रवासाठी आले होते. त्यांनी आपल्या जवळील शिल्लक असलेले भोजन फेकून देण्यापेक्षा स्कायवाॅकवर झोपलेल्या दोन इसमांना देण्याचा प्रयत्न केला.
त्या दोन इसमांना मोहम्मद यांनी झोपेतून उठवले. त्यावेळी त्या इसमांनी आक्रमक पवित्रा घेत भोजन देणाऱ्या मोहम्मद अन्सारी यांना पकडून त्यांना चाकूचा धाक दाखवला. मी तु्म्हाला भोजन देत आहे, असे मोहम्मद सांगत होते. पण दोन्ही फिरस्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मोहम्मद यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याशी झटापटी करून त्यांच्या खिशातील साडे तीन हजार रूपये काढून घेतले. याशिवाय पाकीट हिसकावून त्यामधील आधारकार्ड, पॅनकार्ड, रेल्वेचे तिकीट असा महत्वाचा ऐवज चाकूचा धाक दाखवून हिसकावून पळ काढला. सेवा करायला गेले आणि ती सेवा त्यांच्या अंगलट आली.
मोहम्मद अन्सारी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटना घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासून हे दोन्ही आरोपी राहुल भगत, विशाल सूर्यवंशी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे दोघे कल्याणचे रहिवासी आहेत. ते फिरस्ते आहेत. हवालदार मझा याप्रकरणाचा तपास करत आहेत.