ठाणे : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुधवारपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यातील काही मोजक्या केंद्रांवर पहिल्या दिवशी या वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी मंगळवारी रात्री उशिरा कोर्बेव्हॅक्स लशीचा साठा प्राप्त झाला. त्यामुळे इतर महापालिका क्षेत्रात या साठय़ाचे वितरण बुधवारी सकाळी करण्यात आले. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण वगळता जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये पहिल्या दिवशी या वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नाही.

दरम्यान, पहिल्या दिवशी लसीकरण मोहीम राबविण्यात आली त्या शहरात नेमके कोणत्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे याबाबत पालक अनभिज्ञ असल्यामुळे पहिल्या दिवशी लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील मुलांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली.

Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर
Applications for police recruitment can now be made till April 15 mumbai
पोलीस भरतीसाठी आता १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

१ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० पर्यंत जन्मलेली मुले सध्या लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. या वयोगटातील लाभार्थीच्या लसीकरणाकरिता केवळ कोर्बेव्हॅक्स लशीचा वापर करण्यात येत आहे. ही लस शासकीय करोना लसीकरण केंद्रांवरच उपलब्ध आहे. या लशीची दुसरी मात्रा लाभार्थीला २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात पहिल्या दिवशी केवळ ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण भागात या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्याला मंगळवारी रात्री उशिरा १ लाख १२ हजार २०० कोर्बेव्हॅक्स लशीचा साठा प्राप्त झाला. परिणामी, जिल्ह्यातील इतर महापालिका क्षेत्रात बुधवारी सकाळी लशीच्या साठय़ाचे वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या दिवशी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण भाग वगळता इतर कोणत्याही शहरात या वयोगटातील मुलांचे लसीकरण होऊ शकले नाही. तर, ठाणे शहरातही केवळ महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील मुलांना लस देण्यात येत होती. या केंद्रालगतच्या परिसरात असलेल्या काही शाळेतील मुलांना या ठिकाणी लस देण्यात आली. ग्रामीण भागातही केवळ तीन ते चार केंद्रांवरच या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले. नेमके कोणत्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे याबाबत पालक अनभिज्ञ असल्यामुळे पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील मुलांची तुरळक गर्दी दिसून आली. अन्य शहरांत गुरुवारपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्राप्त झालेला कोर्बेव्हॅक्स लशीचा साठा

शहर                        लस साठा

ठाणे                        २५०००

कल्याण-डोंबिवली        २१०००

भिवंडी                       ७५००

उल्हासनगर                   ५५००

मीरा भाईंदर                  १२५००

नवी मुंबई                   १७०००

ठाणे ग्रामीण                  २३७००

एकूण                       ११२२००