महापालिकेची मोहीम; लस न घेतलेल्या पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचा निर्णय

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आजपासून ‘हर घर दस्तक’ या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांना वेतन मिळणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ११ लाख ७४ हजार ९९० नागरिकांनी करोना लशीची पहिली तर ६ लाख ७५ हजार ७५३ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. शहरातील ५ लाख ३५ हजार नागरिकांनी अद्यापही लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. महापालिकेतील आरोग्य कर्मचारी आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीला लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती, तरीही अनेकांनी लशीची एकही मात्रा घेतलेली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याचबरोबर काही खासगी डॉक्टरांनीही लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर पूर्वी पुरेसा लससाठा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे नागरिकांना लशीपासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता पालिककडे मुबलक लशींचा साठा उपलब्ध असतानाही लसीकरण केंद्रांवर नागरिक लस घेण्यासाठी येत नाहीत. शहरात राबविण्यात येत असलेल्या शिबिरांनाही नागरिक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. यामुळे ‘हर घर दस्तक’ या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर म्हस्के यांनी दिली. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील खासगी आस्थापनांना मालक, कर्मचारी यांनी लस घेतली आहे की नाही याची तपासणी करून त्यांना लस देण्यात येणार आहे. शहरातील गृहसंकुलांच्या अध्यक्ष आणि सचिवांना पत्र पाठविण्यात येणार असून त्यामध्ये इमारतीत कुणीही लस घेतली नसेल तर लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना करण्यात येणार आहे, अशी माहीती महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

मोहीम काय आहे?

* संपूर्ण शहरात आजपासून सुरू होणारी ही मोहीम ३० नोव्हेंबपर्यंत राबविली जाणार आहे.

* या मोहिमेसाठी १६७ जणांचे पथक नेमण्यात आले असून त्यामध्ये डॉक्टर, वॉर्डबॉय, आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी, आशा सेविका यांचा समावेश आहे.

* शिक्षक आणि आशा सेविका घरोघरी जाऊन लस घेतलेली नाही अशा व्यक्तींची माहिती संकलित करणार आहेत.

* त्यानंतर पालिका आरोग्य विभागाचे पथक त्यांना लशीचे महत्त्व पटवून देऊन लस देणार आहेत.

लस नसेल तर केसपेपर नाही?

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज ८०० च्या आसपास रुग्ण तपासणीसाठी येतात. या रुग्णांना घेऊन येणाऱ्या नातेवाईकांनी लस घेतली नसेल तर त्यांना केसपेपर द्यायचा नाही, असा प्रस्ताव विचारधीन आहे. परंतु यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे तूर्तास याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे महापौर म्हस्के यांनी सांगितले. काही डॉक्टर लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. डॉक्टर नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे डॉक्टर संघटनांची बैठक घेऊन त्यामध्ये अशा डॉक्टरांनी लस घ्यावी, असे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही लस घेतली नाही तर त्यांच्या दवाखाना नोंदणी संदर्भात काही निर्णय घेता येतो का याची चाचपणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.