‘मिशन कवचकुंडल’ मोहिमेला उत्तम प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्ह्याला सध्या लशीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८० लाख ३८ हजार ३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५३ लाख ८९ हजार ५७९ नागरिकांची लशीची पहिली मात्रा तर २६ लाख ४८ हजार ४५५ नागरिकांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यातील लसीकरण वेगाने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ८ अॉक्टोबर ते १४ अॉक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवचकुंडल’ मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

अॉगस्ट महिन्यापासून जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस साठा उपलब्ध होऊ लागल्यामुळे लसीकरण मोहिमेला पुन्हा वेग आल्याचे दिसून आले. सध्या दिवसाला केवळ २० ते २५ हजार नागरिकांचेच लसीकरण करण्यात येत होते. राज्य सरकरकडून लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाच्या सत्रात वाढ करण्यात आली असून दिवसाला ५० ते ६० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

मोहिमेचा फायदा

 ‘मिशन कवचकुंडल’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ४,४४७ सत्रे राबविण्यात आली होती. या सत्रात ४ लाख ५४,४१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये २ लाख ९८ हजार ७३७ नागरिकांनी पहिली आणि १ लाख ५५ हजार ६८२ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. ग्रामीण भागात या कालावधीत ५५० सत्र आयोजित करण्यात आली होती. या सत्रात १लाख ७१२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ७६,८२२ नागरिकांना लशीची पहिली  मात्रा तर, २३, ८९० नागरिकांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली.