ठाणे जिल्ह्यात २६ टक्के लाभार्थीच्या दोन मात्रा पूर्ण

सागर नरेकर/पूर्वा साडविलकर
ठाणे : करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने राबविण्याची आवश्यकता सातत्याने व्यक्त होत असली तरी ठाणे जिल्ह्य़ात मात्र आतापर्यंत केवळ २६ टक्के नागरिकांनाच करोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेता आले आहेत. राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्य़ाला उपलब्ध होत असलेला लशीचा साठा हा लाभार्थी नागरिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे वारंवार लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे.

शासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत ९ लाख ४९ हजार ३१४ नागरिकांच्या लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्य़ातील लोकसंख्येचे एकूण प्रमाण लक्षात घेता अजूनही मोठय़ा संख्येने नागरिक दोन्ही लशींच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लसीकरण केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. मे आणि जून महिन्याच्या कालावधीत लसीकरण मोहिमेला वेग आला. परंतु जुलै महिन्यात जिल्ह्य़ात लशीचा तुटवडा भासू लागल्यामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार व्यत्यय येऊ लागला. यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर ओढावली. या वेळी दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी होती. दुसरी मात्रा मिळत नसल्यामुळे अनेक नागरिक हवालदिल झाले होते. यामुळे अनेकदा लसीकरण केंद्रांवर गोंधळाची परिस्थती निर्माण झाली.

ठाणे जिल्ह्य़ात सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांची संख्या ७३ लाख ४३ हजार ७९१ असून आतापर्यंत केवळ २६ टक्के नागरिकांच्या लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. २८ लाख १४ हजार १७५ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. यापैकी केवळ ९ लाख ४९ हजार ३१४ नागरिकांच्या लशीच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्य़ातील लाभार्थी नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रचंड कमी आहे यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. परंतु केंद्राबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना लसविनाच परतावे लागत आहे.

आणखी २५ हजार मोफत लसमात्रा

नवी मुंबई : शासनाकडून लसमात्रा मिळत नसल्याने मोफत लसीकरण विस्कळीत होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सामाजिक दायित्व निधीतून मोफत लसीकरणावर भर दिला आहे. गेल्या आठवडय़ापासून हे लसीकरण सुरू असून पहिल्या टप्प्यातील २५ हजार लसमात्रांपैकी २२ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले असून आणखी २५ हजार लशी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सिटी बँक यांच्या सामाजिक दायित्व निधीतून व जसलोक रुग्णालयाच्या  व चाईल्ड फंड संस्थेच्या सहकार्याने हे लसीकरण सुरू आहे.

१६ ऑगस्टपासून हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तुर्भे, इंदिरानगर तसेच कोपरखैरणे या विभागातील नागरिकांचे सर्वेक्षण चाईल्ड फंड या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असून आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकांना हे लीसकरण करण्यात येत आहे. प्रथम २५ हजार लसमात्रा देण्याचे ठरविले होते. यापैकी २२५०० जणांना लस देण्यात आली आहे. तर आणखी २५ हजार लशी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आज दुसरी मात्रा

नवी मुंबईला गेली चार दिवसांपासून लस पुरवठा झालेला नाही. त्यामुळे लसीकरण माहिम सोमवारपासून विस्कळीत झाली आहे. मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होत आहे. गुरुवारी पालिका रुग्णालयांत फक्त दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.