कल्याण – मी सामान्य परिस्थितीमधून जीवनाची वाटचाल केली. अतिशय समाधानाने जीवन जगले. जिव्हाळ्याचा कुटुंबकबिला शिक्षण, नोकऱ्या करून आपआपल्या मार्गी लागला. हातून देवधर्म झाले. त्यामुळे आपण शेवटी देह ठेऊ, त्यावेळी आपले कोणतेही अंत्येष्टीचे विधी करू नयेत. वैद्यकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरला अभ्यासासाठी आपला देह उपयोग पडला पाहिजे. यासाठी आपले देहदान करावे, असा सल्ला निधनापूर्वी कल्याणमधील एका ज्येष्ठ शिक्षकाच्या ९१ वर्षाच्या निरक्षर वच्छला लिखार या वृध्द महिलेने आपल्या कुटुंबीयांना दिला होता. या वृध्देचे नुकतेच निधन झाले. या वृध्देच्या सूचनेप्रमाणे कुटुंबीयांना तिचा देह देहदानासाठी आवश्यक प्रक्रिया करून शासकीय रुग्णालयात दिला.
‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ या म्हणीप्रमाणे या निरक्षर महिलेने कृती केली आहे. कधीही पाटीवर रेष ओढण्याची वेळ आणि पुस्तकाशी संबंध आला नसताना उच्च विचार जपणाऱ्या वच्छला चंद्रभान लिखार (वय ९१) यांनी मृत्यूनंतर देहदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. ग्रामीण भागात आपले बहुतांश आयुष्य वच्छला लिखार यांनी घालवले. घरात मुले, बाळे यांची विविध विषयावर चर्चा होत होती. ही चर्चा वच्छला यांच्या कानावर पडायची. कधी त्या चर्चेत अधिकारवाणीने सहभागी होत होत्या.
देहदान महत्व
अशाच चर्चेतून वच्छला यांना यांना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या भाचीमार्फत देहदानाचे महत्त्व समजले. देहदान केल्याने गरजू रुग्णाला त्याला आवश्यक असलेला अवयव उपलब्ध होतो. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शरीर अभ्यासासाठी मृत देहाचा उपयोग होतो. मृत्यूनंतर कोणत्याही कर्मकांडात न अडकता नागरिकांनी मृत्यूनंतर देहदान केले तर त्याचा वैद्यकीय विद्यार्थी, अन्य रुग्णांना लाभ होतो. ही माहिती ऐकल्यावर वच्छला यांनी विलंब न करता आपल्या निधनानंंतर आपण देहदान करणार असल्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कुटुंबियांना सांगितला. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही,’ हा विचार करून सुमारे पाच वर्षांपूर्वीच कुटुंबियांच्या मदतीने त्यांनी देहदानाचा अर्ज भरून ठेवला होता.
वच्छला यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना कोणताही आजार नव्हता. वच्छला यांचा चिरंजीव आणि कल्याणच्या नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास लिखार आणि कुटुंबीयांनी आईच्या इच्छेप्रमाणे तिची देहदानाची इच्छा पूर्ण केली. आईच्या अंतिम इच्छेनुसार पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव नागपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्येष्टीचे प्रतीकात्मक विधी पार पाडले. तेरावा विधीचा खर्चही वृद्धाश्रमाला दान द्यावा, ही वच्छला लिखार यांची इच्छादेखील कुटुंबीय पूर्ण करणार असल्याचे शिक्षक विलास यांनी सांगितले.
औपचारिक शिक्षण नसतानाही समाजाला दिशा देणारा इतका मोठा निर्णय घेणाऱ्या वच्छला लिखार यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
