डोंबिवली – कल्याण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना तुल्यबळ लढत देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी रविवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. आपण व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे दरेकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की मागील दोन वर्षापासून आपण या पदावर कार्यरत आहे. आता व्यक्तिगत कारणामुळे आपणास या पदाला न्याय देता येत नाही आणि संघटनेच्या कामाला वेळ देता येत नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत. या राजीनामा पत्राची प्रत ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांनाही देण्यात आली आहे.

दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे डोंबिवलीतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाची एक बुलंद तोफ म्हणून वैशाली दरेकर यांच्याकडे पाहिले जात होते. कल्याण लोकसभा निवडणुकीत नवखा चेहरा म्हणून त्या उतरल्या होत्या. तरीही त्यांनी उपलब्ध ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनुष्यबळ, तुटपुंज्या बेगमीच्या साहाय्याने शिवसेना भाजप महायुतीचे बलदंड उमेदवार शिंदे गटाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर तुल्यबळ लढत देऊन साडे तीन लाखाहून अधिक मते मिळवली होती. या निवडणुकीत आपण विक्रमी साडे सहा ते सात लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होऊ, या शिंदे गटाच्या मनसुब्यांना खीळ घातली होती.

शिवसेना, मनसे, ठाकरे गट असा दरेकर यांचा राजकीय प्रवास झाला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत मनसेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. अभ्यासपूर्ण निवेदन आणि प्रभावी वक्तृत्व ही त्यांची ख्याती आहे. डोंबिवलीत ठाकरे गटाचे जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या साथीला महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर ही पक्षाची ताकद आहे. दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. ठाकरे गटाच्या नेतृत्वाचे कल्याण डोंबिवलीकडे फारसे लक्ष नसल्याने, पक्ष वाढ, कार्यकर्ते संघटन याच्यासाठी कोणतेही कार्यक्रम पक्षाच्या वरिष्ठांकडून लावले जात नसल्याने यापूर्वीच ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे शिवसेना, भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाकडून डोंबिवली, कल्याण परिसरात कोणतेही धोरणात्मक विषयावर मंथन, विषय मार्गी लावण्यासाठी हालचाली केल्या जात नाहीत, अशी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची खंत आहे.

कल्याण लोकसभा निवडणुकीनंतर हळुहळू वैशाली दरेकर राजकीय व्यासपीठापासून दूरच होत्या. कल्याण, डोंबिवली शिंदे शिवसेना, भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण जोमाने सुरू आहे. या स्पर्धेचे वारे दरेकर यांच्याकडे पण सरकते की काय अशी चर्चा सुरू आहे. अशी झुळुक आली तरी वैशाली दरेकर त्याला किती स्थान देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.