ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत सन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सुरु होता. हे नाटक बंद पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनाच्या आवारात गोंधळ घातला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संगीत सन्यस्त खड्ग नाटकामध्ये बुद्ध तत्त्वज्ञानाची अहवेलना झाल्याचा आरोप विविध आंबेडकरवादी संघटनांकडून केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे दोन गट आले. यातील महिलांच्या गटाने नाटकाला तीव्र विरोध करत गोंधळ घातला. हे नाटक बंद करा अशी मागणी त्यांनी केली. तर दुसऱ्या गटाने हे नाटक पाहिल्यानंतर आक्षेप नोंदविणार असल्याचे म्हटले. महिलांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. पोलिसांनी त्या गटाला अडविले. तर नाटक पाहून आक्षेप नोंदविणाऱ्यांना परवानगी घेतल्याने त्यांना नाटक पाहण्यासाठी पाठविण्यात आले.
