डोंबिवली : लोकल, मेल, एक्सप्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक चोरट्यांना रेल्वे पोलीस अटक करत आहेत. या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये डोंबिवलीतील एका महिलेची पिशवी एक्सप्रेसमधील मंचकावर घाईगडबडीत विसरली.
दुसऱ्या दिवशी याच एक्सप्रेसने परतीचा प्रवास करताना भारतीय रेल्वे खाद्य आणि पर्यटन विभागाच्या (आयआरसीटी) कर्मचाऱ्याने ही विसरलेली पिशवी स्वताच्या ताब्यात सुखरूप ठेवली होती. ही पिशवी शिर्डी येथील रेल्वे सुरक्षा बळाचे जवान आणि संबंधित कर्मचाऱ्याने डोंबिवलीतील महिलेला आहे त्या स्थितीत परत केली.
डोंबिवलीतील अर्चना कदम, अनुप रवींद्र मुठे आणि ३० महिलांचा गट एका विवाह सोहळ्यासाठी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने शनिवारी कल्याण येथून गेला होता. आरक्षित तिकीट आसनावरून हा गट प्रवास करत होता. शिर्डी येथे उतरताना या महिलांमधील एका महिलेची पिशवी घाईगडबडीत साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये मंचकावर (रॅक) विसरली. या महिला लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहचल्यावर त्यांना आपल्यातील एका महिलेची पिशवी एक्सप्रेसमध्ये विसरल्याचे आढळले.
या पिशवीत खाऊ, छत्री आणि इतर वस्तू होत्या. पिशवी हरविल्याने संबंधित महिलेसह इतर महिलांनी हळहळ व्यक्त केली. एक्सप्रेसमधून पिशवी कोणी प्रवाशाने नेली असावी असा अंदाज या महिलांनी बांधला. पिशवी विसरल्याच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.
लग्न सोहळा आटोपल्यानंतर रविवारी डोंबिवलीतील महिलांचा गट पुन्हा शिर्डी रेल्वे स्थानकात परतीच्या प्रवासासाठी आला. साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने त्या परतीचा प्रवास करणार होत्या. परतीचा प्रवास करण्यापूर्वी अर्चना कदम, अनुपा मुठे यांनी या एक्सप्रेसमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बळाचे जवान शंकर यादव यांच्याकडे शनिवारी साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विसरलेल्या पिशवीविषयी विचारणा केली. जवान यादव यांनी यासंदर्भात तातडीने वंदे भारत एक्सप्रेसमधील आयआरसीटीसीचा प्रवासी साहाय्यक कर्मचारी शिवा सिंग यांच्याकडे हरविलेल्या पिशवीसंदर्भात विचारणा केली.
शिवा सिंग यांनी शनिवारी एक पिशवी प्रवासी डब्यात विसरला आहे. ती पिशवी आपण जशीच्या तशी सांभाळून ठेवली आहे, असे उत्तर जवान यादव आणि संबंधित महिलांना दिले. शिवा सिंग यांनी एक्सप्रेसमधील साठा कक्षात जाऊन ती पिशवी परत आणून जवान यादव यांच्या ताब्यात दिली. एक्सप्रेसमध्ये विसरलेली पिशवी आपणास परत मिळाली याचा आनंद ३० महिलांना झाला.
जवान शंकर यादव आणि प्रवासी साहाय्यक शिवा सिंग यांनी एक्सप्रेसमध्ये विसरलेली महिलेची पिशवी महिलांना परत केली. महिलांनी पिशवीतील खाऊ, छत्री आणि इतर सामान पिशवीत जसेच्या तसे असल्याचे आढळले. रेल्वेतील वाढत्या चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपली एक्सप्रेसमध्ये विसरलेली पिशवी परत मिळाली याचा आनंद महिलांनी व्यक्त केला. वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवासी साहाय्यक शिवा सिंग, जवान यादव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आपुलकी व्यक्त करत महिलांनी साईनगर शिर्डी एक्सप्रेसने पुन्हा कल्याणमधील आपला प्रवास सुरू केला.