लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: शहरातील बहुचर्चित समुह पुनर्विकास योजनाचा (क्लस्टर) शुभारंभापाठोपाठ आता शहराच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच दिवा परिसराच्या दौऱ्यावर येणार असून यानिमित्ताने शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते. येथील शिंदेच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वाद आणि आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.




ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा परिसरातून आठ नगरसेवक निवडून येतात. गेल्या निवडणुकीत येथून सर्वच जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी उपमहापौर रमाकांत मढवी हे दिवा परिसराचे नेतृत्व करीत असून ते शिवसेनेचे येथील शहर प्रमुख आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातही हा परिसर येतो. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या भागावर शिवसेनेने गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रीत करून याठिकाणी राज्य सरकार आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यापैकी काही प्रकल्पांची कामे पुर्णत्वास आली आहे तर, काही प्रकल्पाच्या कामांना सुरूवात होणार आहे. या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भुमीपुजन आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा… शिवमंदिर परिसर सुशोभीकरण दृष्टीपथात; अंबरनाथ नगरपालिकेकडून निविदा जाहीर; दीड वर्षात करणार सुशोभीकरण
राज्यात शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रित सत्तेवर असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील दिवा परिसरात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे चित्र आहे. दिवा शहर बकाल होण्यास शिवसेना (शिंदे गट) दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला होता. पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यास मढवी यांनीही प्रतिउत्तर देऊन आरोप फेटाळून लावले होते. असे चित्र असतानाच मुख्यमंत्री शिंदे हे दिवा परिसराच्या दौऱ्यावर बुधवारी येणार असून त्यावेळेस भाजप काय भुमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकल्पांचे लोकार्पण आणि भुमीपुजन
पाणी प्रकल्प योजनेतंर्गत अंथरण्यात आलेली नवीन मुख्य जलवाहिनी, दिवा-आगासन मुख्य रस्ता, राज्य सरकारकडून मिळालेल्या २१४ कोटी रुपयांच्या निधीतून नुतनीकरण केलेले दिव्यातील विविध रस्ते, दातिवली गाव आरोग्य केंद्र आणि व्यायामशाळा, दातिवली गाव खुला रंगमंच या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तर, आगासन-देसाई खाडी पुल, आगरी-कोळी-वारकरी भवन, धर्मवीरनगर सामाजिक भवन, राज्य सरकारकडून मिळालेल्या ३९१ च्या निधीतून नुतनीकरण करण्यात येणारे दिव्यातील विविध रस्ते, दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा-शीळ रोड, पुरातत्व खिडकाळेश्वर मंदीर परिसर सुशोभिकरण आणि देसाईगाव तलाव सुशोभिकरण या प्रकल्पांचे भुमीपुजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.