पोलीस उपअधीक्षक कार्यालयात जाळून घेणाऱ्या तरुणाचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास झा (वय २२) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात ८ गुन्हे दाखल होते.

विकास झा हा तरुण शुक्रवारी संध्याकाळी वसईच्या उपअधीक्षक कार्यालयात आला होता. कार्यालयाबाहेर आल्यावर त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतले आणि लायटरने पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेत विकास थेट उपअधीक्षकांच्या केबीनच्या दिशेने जात होता. काय गोंधळ सुरु हे पाहण्यासाठी पोलीस उपअधीक्षक विश्वास वळवी केबीनबाहेर आले. विकासने पोलीस उपअधीक्षकांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळवी यांनी प्रसंगावधान दाखवून त्याला दूर लोटले. ७० टक्के भाजलेल्या विकासला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

विकासवर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकासच्या इमारतीत राहणारी महिला दुचाकी शिकत होती. यादरम्यान विकास आणि त्या महिलेमध्ये वाद झाला. विकासने त्या महिलेला बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र या गुन्ह्यात मला अडकवण्यात आले, असे विकासचे म्हणणे होते. आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने विकास निराश झाला होता आणि कारवाई टाळण्यासाठी तो पोलीस उपअधीक्षक कार्यालयात गेला होता.