यंदाच्या पावसाळय़ात विविध पर्यटनस्थळी ११ बळी

हिरवाईने नटलेले निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिनारे लाभलेल्या वसई तालुक्यातील पावसाळय़ात पर्यटनासाठी तरुणाई येत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वसईतील पर्यटनस्थळे धोकादायक ठरू लागली आहेत. यंदाच्या पावसाळय़ात विविध पर्यटनस्थळी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनांत बळी गेलेल्यांमध्ये सर्व तरुणांचा समावेश आहे. बंदी असलेल्या पर्यटनस्थळीही पोलिसांची नजर चुकवून पर्यटक जात असल्याने त्यांना आवरण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

वसई तालुक्यात चिंचोटी आणि तुंगारेश्वर धबधबे आहेत. त्याशिवाय अर्नाळा, भुईगाव, रानगाव, सुरूची बाग, कळंब, राजोडी हे समुद्रकिनारे आहेत. या ठिकाणी दरवर्षी पावसाळय़ात पर्यटक येतात. मात्र उत्साहाच्या भरात पुरेशी काळजी न घेतल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत असतो. जून आणि जुलै महिन्यांत विविध पर्यटनस्थळावर झालेल्या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचे बळी गेले आहेत.

उत्साहाच्या भरात तरुण खोल पाण्यात पोहायला जातात. त्यांच्याकडून सुरक्षेच्या कोणत्याच नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे दुर्घटना होत असल्याचे दिसून येत आहे. धबधब्याच्या ठिकाणी आणि समुद्रकिनारी तरुणांकडून मद्यपान केले जाते. मद्याच्या नशेतच धबधब्यावर आणि समुद्रात जातात आणि आपला जीव गमावतात. या मोसमात वसईच्या भुईगाव समुद्रात वेगवेगळ्या घटनेत पोहायला गेलेल्या पाच जणांचे बळी गेले, तर चिंचोटी धबधब्याखालील डोहात तीन जणांचे बुडून मृत्यू झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात बंदी घातली होती. मात्र तरीही पर्यटक बंदी झुगारून जात होते. काही समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात नसल्याने पर्यटक जिवाची पर्वा न करता खोल समुद्रात जात आहेत.

नैसर्गिक आपत्तीचे ४ बळी

वसईत जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यात शासकीय नोंदीनुसार चार जणांचे बळी गेले आहेत. नारिंगी येथे एक बसचालक प्रकाश पाटील हे तलावात वाहून गेले. सनसिटी येथे दोन स्थानिक मच्छीमार मासेमारी करत असताना वाहून गेले. जुचंद्र येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. नैसर्गिक आपत्तीत जे बळी पडले त्यांना शासनातर्फे ४ लाखांची मदत देण्यात आली आहे. ज्या दिवशी  ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल ती अतिवृष्टी मानण्यात येते आणि त्या वेळी जे दुर्घटनाग्रस्त झाले, त्यांना आर्थिक मदत देण्यात येते. पुरातील बळींच्या कुटुंबांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याची माहिती वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.